अशोक तुपे

नाफेडने बाजारभावाने कांदा खरेदी सुरू केली असली तरी खरेदीचा दर हा उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात लासलगाव व नाफेड वगळता अन्यत्र खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही.

देशात नाफेड एक लाख टन कांदा खरेदी करणार आहे. त्यापैकी ५० हजार टन कांदा हा गुजरात व महाराष्ट्र या दोन राज्यांत खरेदी केला जाणार आहे. यापैकी ४० हजार टन कांदा महाराष्ट्र राज्यातून खरेदी केला जाणार आहे. नाफेडने कांदा खरेदी सुरू केल्यानंतर खुल्या बाजारातील दर वाढतात. पण आता बाजार व्यवस्था ही करोनामुळे बाधित झाली आहे. त्यात मालाला मागणी नाही. मागणी नसल्याने बाजारातील दर पडले आहेत. त्यात बाजार समित्या बंद आहेत. त्याने आणखी पेच वाढला आहे.

नाफेडने लासलगाव व नाफेड बाजार समितीच्या आवारात कांदा खरेदी सुरू केली आहे. हा कांदा बाजारातील सरासरी किंमत काढून केली जाते. ७ रुपये ५० पैसे ते ८ रुपये ७५ पैसे या दराने कांदा खरेदी केला जात आहे. हा दर आता आणखी कमी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय फळबाग मंडळाने कांद्याला प्रति किलो ९ रुपये ३४ पैसे खर्च येतो असा अभ्यास करून अहवाल दिला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने कांदा खरेदी केला जात आहे. लासलगाव व नाफेड वगळता अन्यत्र शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून नाफेड कांदा खरेदी करणार आहे. मात्र कमी दरात कांदा खरेदी करण्यास या कंपन्या तयार नाहीत. त्यांनी केंद्र सरकारला भाव वाढवून देण्याची मागणी केली आहे.  त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघाचे व्यवस्थापक योगेश थोरात म्हणाले की, नाफेड कांदा खरेदी शेतमाल भाव स्थिरीकरण योजनेतून खरेदी करते. बाजारात जर भविष्यात कांद्याचे दर वाढले तर ग्राहकांना रास्त दरात कांदा मिळावा म्हणून ही खरेदी आहे. ती शेतकऱ्यांना योग्य व रास्त भाव द्यावा म्हणून केली जात नाही. ते बाजार भावाने खरेदी करतात. पण आता बाजारात कांद्याचे दर कोसळले आहेत. साहजिकच सरासरी दर कमी निघत आहेत. शेतकरी यात भरडला जात आहे असे ते म्हणाले.

महासंघाने केंद्र सरकारकडे किमान साडेनऊ रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी करावा अशी मागणी केली आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. राज्यात नगर, पुणे, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्य़ांत कांदा खरेदी केली जाणार आहे. भावाचा निर्णय झाल्यानंतर खरेदी सुरू होईल, असे ते म्हणाले.

राहुरीचा अजब निर्णय

नगर जिल्ह्य़ातील बाजार समित्यांच्या आवारातील कांद्याचे व्यवहार बंद आहेत. राहुरी बाजार समिती उद्या सोमवारपासून कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करणार आहे. मात्र त्यांनी केवळ राहुरी तालुक्यातील कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे माल खरेदीला प्रथमच तालुका हा नियम झाला आहे. या बाजार समितीवर ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे वर्चस्व आहे. एका मंत्र्यांच्या समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे अन्यत्र नाराजी आहे.