पुणे येथील इथेनॉलची निर्मिती करणाऱ्या प्राज या कंपनीसोबत पूर्ती कंपनीने करार केला असून, लवकरच पूर्तीमध्ये दररोज ३० हजार लिटर इथेनॉल निर्माण केले जाणार आहे. एवढय़ा क्षमतेचा देशातील हा पहिला, तर आशिया खंडातील तिसरा प्रकल्प ठरणार आहे. देशात अशाच पद्धतीने प्रकल्प उभे राहिले तर पेट्रोलियम पदार्थाची आयात करावी लागणार नाही. त्यामुळे देश आर्थिकदृष्टय़ा समृद्ध होऊ शकतो, अशी माहिती अ‍ॅग्रोव्हिजनचे प्रवर्तक व भाजप नेते नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘दरवर्षी भारताला ८ लाख कोटी रुपयांचे पेट्रोल, डिझेल व गॅस आयात करावे लागते. या आयातीमुळे भारतीय चलन विदेशात जात असल्याने भारताची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. देशाला समृद्ध करावयाचे असेल तर या पदार्थांची आयात कमी करणे आवश्यक आहे. ज्वारीचे फण, तुऱ्हाटय़ा, पऱ्हाटय़ा यापासून इथेनॉल तयार करता येते. एक टन पऱ्हाटय़ापासून जवळपास २६० ते २७० लिटर इथेनॉल तयार होते. विदर्भात मोठय़ा प्रमाणात पऱ्हाटय़ा, तुऱ्हाटय़ा व ज्वारीचे फण (बायोमास) उपलब्ध आहे. या बायोमासपासून सध्या पूर्तीमध्ये दररोज दोन हजार लिटर इथेनॉल निर्माण होते. पुणे येथील प्राज या कंपनीसोबत पूर्ती कंपनीने करार केला आहे. हा नवीन प्रकल्प लवकरच सुरू होणार असून, त्यातून दररोज ३० हजार लिटर इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे. सध्या पेट्रोलमध्ये ५ टक्के इथेनॉल वापरण्याची परवानगी आहे. परंतु २० टक्के वापराची परवानगी मिळावी,’ अशी आमची मागणी असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
उसाच्या मळीपासूनही इथेनॉल तयार होते. पश्चिम महाराष्ट्रात ऊस अधिक पिकतो. शेतकरी शेतातील तण कचरा म्हणून पेटवून टाकतात. परंतु या कचऱ्यापासून पेट्रोल, डिझेल व गॅस तयार होत असल्याने शेतकरी समृद्ध होणार आहे. निरुपयोगी वस्तूंपासून पैसा मिळत असल्याने विदर्भातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही. तसेच रोजगारही उपलब्ध होईल. सध्या पूर्तीने १५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
या वेळी प्राज कंपनीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक (व्यापार) उदय कुळकर्णी यांनी सांगितले की, उसाचे चिपाड, मक्याचे धाटे, गवत व इतर पालापाचोळा यापासून इथेनॉलची निर्मिती करत असल्याचे सांगितले. आम्ही आता हे तंत्रज्ञान जगाला देऊ शकतो. ७० कोटी रुपयांची गुंतवणूक करून येत्या नऊ महिन्यांत दुसरा प्रकल्प सुरू करणार आहोत.