ठेकेदाराचे बील मंजूर करण्यासाठी  २२ हजार रूपयांची लाच मागणाऱ्या दोन अभियंत्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.  नाशिक येथील उत्तर विभाग कार्यालयातील कार्यकारी अभियंता सतीश मधुकर चिखलीकर आणि  त्र्यंबकेश्वर उपविभागीय कार्यालयातील शाखा अभियंता जगदिश मदन वाघ अशी या अभियंत्यांची नावे आहेत. रात्री उशिरापर्यंत या दोघांच्या घरांच्या झडतीत तीन कोटीपेक्षा अधिक रोख रक्कम, दागिने आणि मालमत्तांची कागदपत्रे आढळून आली.तक्रारदार ठेकेदारास रावत ते काकडवळण या रस्त्याच्या कामाचा ठेका २००९ मध्ये मंजूर झालेला आहे. कामाचे तीन लाख ८९ हजार ९१६ रुपये बील मंजूर करण्यासाठी या दोघांनी लाच मागितली होती. त्यामुळे ठेकेदाराने तक्रार केली होती.