महाराष्ट्रातील रस्ते चार पदरी होत नाही तोपर्यंत राज्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार नाही असे स्पष्ट करतानाच खंडाळा घाटात अवजड वाहनांमुळे भीती वाटते, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हे बुधवारी लोणावळा आणि खंडाळा या भागातील दौऱ्यावर होते. या भागातील विविध प्रकल्पांचे भुमिपूजनही त्यांच्या हस्ते झाले.  चंद्रकांत पाटील म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग हा चार पदरीच करावा लागतो. तसेच राज्यातील रस्तेदेखील चार पदरी होत नाही, तोपर्यंत ही भीषण वाहतूक कोंडी कमी होणार नाही. आता प्रत्येक घरात एक गाडी झाली. एवढ्या गाड्या भविष्यात रस्त्यावर येतील याचा आपण कधीच विचार केला नव्हता, असे त्यांनी सांगितले.

खंडाळा घाटात तर अवजड वाहनांमुळे भीती वाटते. शेतमालापासून विविध प्रकारच्या मालाची वाहतूक तेथून केली जाते. या रस्त्यांवरुन इतक्या मोठ्या प्रमाणात अवजड वाहने जातील, असे वाटले नव्हते, असेही त्यांनी सांगितले.