बलात्काराच्या आरोपांमुळे चर्चेत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी आणि शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी पाठिंबा दर्शवला आहे. मुंडेंना आपला पाठिंबा दर्शवताना त्यांनी एक विधान केलं असून यामुळे ते चर्चेत आले आहेत. धनंजय मुंडे यांना पाठिंबा दर्शवताना “प्यार किया तो डरना क्या” असं सत्तार जालना येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

सत्तार म्हणाले, “मुंडे यांनी स्वतःहून हे जाहीर केलं आहे की, तक्रारदार महिलेच्या बहिणीशी त्यांचे संबंध होते आणि या महिलेपासून त्यांना दोन मुलं असून त्या महिलेसह मुलांना त्यांनी स्विकारलं असून आपलं नावही दिलं आहे. मुंडेंनी काहीही लपवलेलं नाही, प्यार किया तो डरना क्या. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी संबंधीत महिलेने केलेले बलात्काराचे आरोप फेटाळले असून आरोप करणारी संबंधित महिला आणि तिची बहिण आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सत्तार पुढे म्हणाले, जेव्हा भाजपाचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांना नव्वदच्या काळात एका महिलेशी संबंध असल्याच्या आरोपांवरुन टीकेला सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री असलेल्या गोपिनाथ मुंडे यांची पाठराखण केली होती. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात वैयक्तिक माहिती लपवल्याबाबत विचारले असता सत्तार म्हणाले, “नेते मंडळी बऱ्याचदा असं करतात, जे आरोप करत आहेत त्या भाजपाच्या मंत्र्यांनीही असं केलं आहे. आपल्याला भाजपातील असे काही नेते माहिती आहेत. योग्य वेळ आल्यावर आपण त्यांना उघडं पाडू, असंही सत्तार यांनी म्हटलं आहे.”