जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत लोकसभेतील पॅटर्नची छाप राहील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. प्रत्यक्षात राजेश विटेकर यांनी जोरकस मोच्रेबांधणी केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरूझाला आहे. सुरेश वरपूडकर, आमदार रामप्रसाद बोर्डीकर व सीताराम घनदाट, तसेच खासदार संजय जाधव यांच्या ‘चौकोनी’ राजकारणाला छेद मिळाल्याने तिचे वेगळेपण अधिक आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांचा पराभव करण्याच्या उद्देशाने वरपूडकर-बोर्डीकर यांनी एकत्रितपणे जाधव यांना मदत केली. जाधव हे भांबळे यांचे प्रतिस्पर्धी होते. त्यामुळे त्यांचा प्रश्न नाही, पण वरपूडकरांना भांबळे यांचा हिशेब चुकता करायचा होता आणि बोर्डीकरांनाही राजकीयदृष्टय़ा भांबळे यांना नामोहरम करायचे होते. या दोघांनी जाधव यांना सढळ मदत केली. मोदी लाटेत भांबळे यांचा पराभव झाला, पण या निकालाने वरपूडकर-बोर्डीकरांना मनस्वी समाधान झाले.
लोकसभेतील यशानंतर जिल्ह्यात राजकीय पक्षांना बाजूला ठेवून परस्पर हितसंबंधांचे ‘चौकोनी’ राजकारण उदयाला आले. चौकोनी राजकारणातूनच जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीकडे पाहिले जात होते. वरपूडकरांचे पुत्र समशेर यांना अध्यक्षपदासाठी तयार करताना बोर्डीकर, जाधव, घनदाट यांची मदत गृहीत धरली होती. राष्ट्रवादीत उभी फूट पडलीच होती. पण चौकोनी राजकारणाला शह देण्याच्या दृष्टीने शिवसेना व काँग्रेसमध्येही फूट पडली. काँग्रेसमध्ये बोर्डीकरांना शह देण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख व खासदार जाधव यांना शह देण्यासाठी आमदार मीरा रेंगे यांच्या बाजूने प्रयत्न झाले. वरपूडकर-बोर्डीकर-जाधव यांची रणनीती यशस्वी होऊ नये, म्हणून राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष भांबळे, आमदार बाबाजानी दुर्राणी, सुरेश देशमुख सक्रिय झाले. राजेश विटेकर यांनी यशस्वी मोच्रेबांधणी केली. शिवसेनेने वरपूडकर गटाला पाठिंबा द्यायचे ठरविले, तरी आपली अडचण होऊ नये एवढे संख्याबळ विटेकर यांनी जमवले. निवडीच्या वेळी तटस्थ राहून सेनेही आपली पत राखली. सेनेने वरपूडकर गटाच्या बाजूने मतदान करायचे ठरवलेच असते, तरीही सेनेचे काही सदस्य विटेकर यांच्या बाजूने थेट मतदान करणार होते. सेना तटस्थ राहिल्याने ‘झाकली मूठ’ राहिली.
अध्यक्षपदाच्या रणनीतीत यशस्वी होऊ शकत नाही, असे लक्षात आल्यावर वरपूडकर यांनी सेनेचा अध्यक्ष करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. शेवटचे २-३ दिवस घडामोडींना वेग आला. शेवटच्या क्षणापर्यंत वरपूडकर गटाच्या हालचाली सुरू होत्या. वरपूडकर गटाच्या बाजूने थेट मतदान करावे, अशी ज्या सेना नेत्यांची इच्छा होती त्याच नेत्यांनी आपला अध्यक्ष होत असेल व त्याला वरपूडकर-बोर्डीकर गटाची मदत मिळत असेल तर काय हरकत असेल, असा युक्तिवाद पक्षनेतृत्वासमोर केला. या निवडीत सेनेची भूमिका काय राहील, हे शेवटपर्यंत कळत नव्हते. अध्यक्ष सेनेचा होणार असेल तरीही तो जाधव गटाचा की, रेंगे गटाचा असा प्रश्न होताच. याचा विचार करून तटस्थ राहणे ही सेनेची मजबुरीच होती.
अध्यक्षपदी विटेकर व उपाध्यक्षपदी लहाने यांच्या निवडीने जिल्ह्याच्या राजकारणात वरपूडकरांना मोठा हिसका बसला. या निवडीचा परिणाम पाथरी विधानसभा निवडणुकीवरही दिसणार आहे. लोकसभेच्या पराभवानंतर भांबळे, बाबाजानी यांचा हरवलेला आत्मविश्वास या निवडीने पुन्हा मिळाला. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत वरपूडकर गटाची सरशी झाली असती, तर लोकसभेपासून जिल्ह्याच्या राजकारणात साकारलेल्या ‘चौकोनी’ पॅटर्नचा बोलबाला आणखी वाढला असता. विटेकर यांच्या निवडीने हा ‘चौकोनी’ पॅटर्न काही अंशी का होईना, पण निष्प्रभ ठरला. त्यातही वरपूडकरांच्या अडचणी वाढल्या आहेत. विटेकरांच्या निवडीने जि.प.तला ‘भागिले ५२’चा पॅटर्न जाऊन काही चांगले काम घडावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.