अवकाळी पावसाचा फटका; कृषी क्षेत्रालाच फटका

प्रबोध देशपांडे, लोकसत्ता

अकोला : खरीप हंगामातील सोयाबीन काढण्याच्या वेळी अवकाळी पावसाचा जबर फटका बसला. बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झालेल्या ८० टक्के सोयाबीनचा दर्जा घसरला आहे. त्याचा परिणाम सोयाबीनच्या दर्जावर झाला. परिणामी, हमीभाव मिळत नसल्याची स्थिती आहे.

मध्य भारतात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हा सोयाबीन उत्पादकांचा मोठा पट्टा आहे. दोन्ही राज्यात खरीप हंगामात सोयाबीनचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. पश्चिम विदर्भातही सोयाबीनच्या क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. एकेकाळी कापूस उत्पादकांचा भाग म्हणून पश्चिम विदर्भाची ओळख होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शेतकरी कापूसऐवजी सोयाबीनकडे वळले आहेत. सोयाबीनच्या पेऱ्यात प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात सुरुवातीला दमदार पाऊस कोसळल्याने सोयाबीनचे पीक चांगले बहरले होते. सोयाबीनचे भरघोस व दर्जेदार उत्पादन येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ऐन सोयाबीन सोंगणीच्या काळात परतीचा व त्यानंतर अवकाळी पाऊसही झाला. महाराष्ट्र व मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी हा जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे शेतातील सोयाबीनचे उभे पीक काढायलाही वेळ मिळाला नसल्याने ते खराब झाले.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये साधारणत: नोव्हेंबर ते जानेवारीच्या दरम्यान सोयाबीनची मोठय़ा प्रमाणात आवक होते. गेल्या खरीप हंगामात सोयाबीनचे चांगले उत्पादन झाले, मात्र त्याचा दर्जा राखता आला नाही. अवकाळी पावसामुळे सोयाबीने दाणे काळे व लहान झाले आहेत. सुमारे ८० टक्के सोयाबीनचे दर्जाहीन उत्पादन झाले. केंद्र शासनाने सोयाबीनला ३७१० रुपये हमीभाव जाहीर केला. सोयाबीनच्या उत्पादित मालाचा दर्जाचाच नसल्याने बहुतांश मालाला हमीभाव मिळाला नाही. सुमारे २० टक्के दर्जेदार मालाला हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे.

विदर्भातील दुसरी सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या खामगावमध्ये या हंगामात सोयाबीनला सर्वाधिक ४३२५ रुपयांचा दर मिळाला.

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खुल्या पद्धतीने हर्रासी होऊन मालाची विक्री होते. या पद्धतीमुळे चांगला दर मिळत असल्याने सुमारे २०० कि.मी. अंतरापर्यंतचे शेतकरी याठिकाणी माल विक्रीसाठी आणतात. खामगाव बाजार समितीमध्ये १ एप्रिल ते ३१ डिसेंबरच्या कालावधीत १० लाख ९० हजार क्विंटलची आवक झाली. यामध्ये सर्वाधिक ४३२५ रुपये, तर दर्जाहीन उत्पादनाला अत्यल्प केवळ १००० रुपयांचा दर देण्यात आला. सोयाबीनला सरासरी २६६३ रुपयांचा दर मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत कमाल दर वाढला असला तरी सरासरी दर घसरला आहे. खामगावमध्ये १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीत १० लाख ८८ हजार क्विंटलची आवक झाली होती. सर्वाधिक दर ३८५० रुपये, तर सर्वात कमी २३०० रुपये दर मिळाला होता. यावर्षी उत्पादनातील दर्जावरून दरात मोठी तफावत दिसून येत आहे. सोयाबीनचे उत्पादन वाढूनही दर्जाअभावी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

सोयाबीन तेलाच्या भावाचा भडका

सोयाबीनच्या दर्जाहीन उत्पादनाचा फटका तेलाच्या उत्पादनावर झाला. तेल उत्पादक कंपन्यांना दर्जेदार सोयाबीनचा पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे सोयाबीन तेलाच्या भावाचा चांगलाच भडका उडाला आहे. किलो मागे सोयाबीनचे तेल १५ ते २० रुपयांनी महागल्याने ग्राहकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.

भाववाढीच्या अपेक्षेने साठवणूक

अधिक भाव मिळण्याच्या अपेक्षा असल्याने चांगल्या दर्जाच्या सोयाबीनची गोदामांमध्ये साठवणूक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीयसह स्थानिक बाजारपेठेत दरवाढ झाल्यावर ते सोयाबीन विक्रीसाठी बाजारपेठेत येण्याचा अंदाज आहे.

खामगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनची १० लाख क्विंटलवर आवक झाली. मात्र, सोयाबीनच्या मालाचा दर्जा घसरला आहे. सर्वाधिक दर ४३२५ रुपयांचा मिळाला. सध्या आवक घसरली आहे. दैनंदिन पाच ते सहा हजार क्विंटल आवक होत असून, साधारणत: ३८०० रुपयांचे दर आहेत. आगामी काळात दर वाढण्याची शक्यता आहे.

– एम.ए. कृपलानी, प्रशासक, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.

अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे दर्जेदार उत्पादन झाले नाही. दाणे काळसर रंगाचे व लहान आले आहेत. सोयाबीनचे तेल काढताना मात्र दर्जामुळे फारसा फरक पडत नाही. शेतकऱ्यांकडून पडलेल्या दराने सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. 

प्रकाश मानकर, चेअरमन, महाराष्ट्र कृषक समाज.

*‘एनसीडीईएक्स’ मार्फत सोयाबीनची ऑनलाइन खरेदी-विक्री केली जाते. ‘एनसीडीईएक्स’वर या हंगामात ३१ डिसेंबर २०१९ रोजी सोयाबीनला सर्वाधिक ४५०६ रुपयांचा दर मिळाला आहे.

* खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘एनसीडीईएक्स’चे केंद्र असून, त्यामाध्यमातून सोयाबीनची मोठय़ा प्रमाणात उलाढाल झाली आहे.