20 September 2020

News Flash

काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची व्यासपीठावरच वादावादी!

जालना मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार विलास औताडे यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत राष्ट्रवादीचे शहरातील ज्येष्ठ नेते इकबाल पाशा व काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल

| April 5, 2014 01:10 am

जालना मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार विलास औताडे यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत राष्ट्रवादीचे शहरातील ज्येष्ठ नेते इकबाल पाशा व काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यात व्यासपीठावरच वादा-वादी झाली. राष्ट्रवादीचे मंत्री राजेश टोपे यांच्यासमोरच हा प्रकार घडला.
पाशा यांचे भाषण सुरू असताना आमदार सत्तार यांनी त्यांना आवरते घेण्यास सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या पाशा यांनी, उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वक्तयालाच भाषण थांबविण्यास सांगणे योग्य नाही. काँग्रेसला राष्ट्रवादीची गरज नाही का, असेही पाशा यांनी सत्तार यांना विचारले! त्यानंतर भाषणास उभे राहिलेल्या काँग्रेसचे आमदार कल्याण काळे यांनी, ‘वेळ कमी असल्याने आमदार सत्तार काही बोलले असतील. पाशाभाई यांना भाषणाची पुन्हा संधी देऊ!’ तरी मी येताना सत्तारभाई यांच्या डोक्यावर खूप थंड पाणी टाकून आणले होते, असेही ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांची दखल घेण्याची गरज सभेच्या संयोजकांना वाटली नाही. त्यांना भाषण करण्यासही सांगितले नाही. त्यामुळे मध्येच ते व्यासपीठावरून उतरून निघून गेले.
राष्ट्रवादीचे पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, प्रचारात आपला पक्ष काँग्रेसच्या दहा पाऊले पुढे राहील. १५ वर्षांत दानवे यांनी एकही ठळक काम केले नाही. संसदेत ते मौनीबाबा म्हणून ओळखले जातात. दुष्काळ, गारपिटीमुळे शेतकरी अडचणीत आला. त्यावेळी ते मदतीला आले नाहीत. जालना जिल्हा बँक अडचणीत सहकार्याची भूमिका घेण्याऐवजी ती बंद पाडण्याचेच प्रयत्न त्यांनी केले. या वेळी त्यांना हटविण्याचा विडाच सर्वानी उचलला पाहिजे, असेही ते म्हणाले. औताडे यांचा उल्लेख त्यांनी शानदार, तरुण, तडफदार असा केला.
दानवे यांच्याबद्दल मनात चीड, द्वेष व राग असल्यामुळेच आजच्या सभेस मोठय़ा प्रमाणात लोक आले आहेत. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकदिलाने काम करीत आहे, असे आमदार कैलास गोरंटय़ाल म्हणाले. आमदार काळे यांनी, दानवे यांची भाषा संसदेत कोणाला समजत नव्हती व त्यांना संसदेची भाषा कळत नव्हती. या वेळेस त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे म्हटले. दुधड गावातील लोकांनी खासदार निधीतील काम मागितले तर ते म्हणाले होते, निधी सर्वाना वाटला तर कट्टापेटीही कोणाच्या वाटय़ास येणार नाही! त्यांना कट्टापेटीचीच भाषा येते, असा टोला त्यांनी लगावला. आमदार संजय वाघचौरे यांनी, दानवे यांना लोक ‘चकवा’ म्हणून संबोधतात. या खासदाराने पैठणला मोठा निधी देण्याची भाषा केली. प्रत्यक्षात दहा लाख रुपये देऊन नाथ महाराजांनाही चकविले,’ अशी टीका केली.
आमदार सत्तार म्हणाले की, भाजपमध्ये गडकरींचे महत्त्व वाढले तेव्हा दानवे यांनी त्यांना साथ देऊन मुंडे यांनाही चकविले. औरंगाबादच्या कार्यक्रमास लालकृष्ण अडवाणी आले, त्यावेळी त्यांच्याच पक्षाचे नेते हरिभाऊ बागडे गैरहजर होते. ‘अंदर की बात है, नाना हमारे साथ है’ असे सांगून बागडे काँग्रेसच्या पाठीशी असल्याचे सत्तार यांनी सूचित केले आणि ‘थांबा आणि पाहा’चा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.
राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत दानवे म्हणाले की, भोकरदनमध्ये आपण ‘चारित्र्य, विकास व संपर्क’ या त्रिसुत्रीवर कार्य करीत असून त्याच्याशी रावसाहेब दानवे यांचा संबंध नाही. औताडे यांनीही दानवे यांच्यावर टीका करून दिलेला शब्द ते पाळत नसल्याचा आरोप केला. मागील निवडणुकीत बाबरा येथील बालाजी मंदिर देवस्थान परिसरात सभागृह देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. नंतर तेथील मंडळी गेली तर भाषणात जे बोलले जाते सगळे खरेच थोडे असते? असा सवाल त्यांनी केला.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, माजी मंत्री डॉ. शंकरराव राख, प्रभाकर पालोदकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, सुधाकर सोनवणे, आमदार सुभाष झांबड, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हिवाळे, बबलू चौधरी आदींची भाषणे झाली.
राजेंद्र दर्डा यांचा अपवाद!
सभेत सर्वच वक्तयांनी भाजप उमेदवार दानवे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ले केले. दानवे यांची कार्यपद्धती, विकासकामांकडे दुर्लक्ष, खोटे बोलणे आदी अनेक आरोप सर्वच वक्तयांनी त्यांच्यावर केले. नरेंद्र मोदी व भाजपच्या भूमिकेपेक्षा दानवे यांच्यावर थेट व आक्रमक आरोप सर्व वक्तयांनी केला. त्याला अपवाद होता तो शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचा! दर्डा यांनी मोदी व भाजपवर टीका केली. परंतु दानवे यांच्याविरोधात चकार शब्दही काढला नाही!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2014 1:10 am

Web Title: quarrel between ncp congress on stage
Next Stories
1 यूपीए सरकारने निर्भया निधीतील पैसा वापरलाच नाही – मोदींची टीका
2 विद्यार्थ्यांच्या रेव्ह पार्टीवर लोणावळय़ाजवळ छापा
3 केंद्रामध्ये स्थिर शासनाची आवश्यकता- सुप्रिया सुळे
Just Now!
X