News Flash

ऐतिहासिक कोहोज किल्ल्याला दगडखाणींचा फटका

ग्रामस्थांचा आरोप; भाग कोसळण्याचा घटनांमुळे दुर्गप्रेमींना चिंता

ग्रामस्थांचा आरोप; भाग कोसळण्याचा घटनांमुळे दुर्गप्रेमींना चिंता

वाडा:  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन असलेला वाडा तालुक्यातील ऐतिहासिक कोहोज किल्लय़ाला दगडखाणींचा फटका बसत आहे. नुकताच या किल्ल्याचा काही भाग कोसळला होता, त्याला येथील दगडखाणीत होत असलेले उत्खनन  हे कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

कोहोज किल्ला परिसरात दगडखाणी असून या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर उत्खनन केले जाते. तसेच  परिसरात मोठमोठी मौल्यवान झाडे असून या झाडांचीही नेहमीच चोरटी तोड होत असते. येथे दोन दिवसांपूर्वी परिसरात मुसळधार पाऊस पडला.  त्यामध्ये या किल्लय़ाच्या पायथ्याचा काही भाग ढासळला असल्याचे येथे सांगितले जात आहे. पायथ्याचा जवळपास दोन हेक्टर क्षेत्र इतका भाग ढासळला आहे. गतवर्षीसुद्धा  किल्लय़ाच्या पायथ्याचा काही भाग ढासळला होता. या किल्लय़ाच्या परिसरात दगडखाणींमध्ये वर्षभर उत्खनन सुरू असते. यामुळेच या किल्लय़ाच्या पायथ्याचा बराचसा भाग ढासळत चालला असल्याचे या किल्ला परिसरात असलेल्या शेलटे, वावेघर येथील ग्रामस्थांनी सांगितले.  येथील दगडखाणी ह्य कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत, याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे  वावेघर येथील दुर्गप्रेमी विवेक ठाकरे यांनी सांगितले.  दरम्यान या किल्लय़ावर अथवा आसपास पर्यटकांना जाण्यास वाडा पोलिसांनी बंदी आदेश काढला आहे, तर या किल्लय़ाच्या परिसरात असलेल्या दगडखाणी बंद करण्याची मागणी येथील दुर्गप्रेमींनी केली आहे.  शिवकालीन इतिहासाची महती देणारी ही येथील अनमोल संपत्ती आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे वाडा येथील ग्रामस्थ अजित ठाकरे यांनी म्हटले आहे.

पर्यटन स्थळ असूनही विकास नाही

कोहोज किल्लाला शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलेले  आहे. सन २०१८-१९  या वर्षांत  जिल्हा नियोजनच्या बैठकीत या किल्ला परिसरात विकासकामांसाठी मोठय़ा प्रमाणात निधीही मंजूर करण्यात आला होता. मात्र या किल्ला परिसरात अजूनही पर्यटन विकासाचे कुठलेही काम झालेले दिसून येत नाही.

टेहळणी बालेकिल्ला

शिवकालीन साम्राज्यात हा एक टेहळणी बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. या किल्लय़ावरून आजूबाजूचा ४० ते ४५ किलोमीटरचा परिसर दिसून येतो, असे वाडा येथील दुर्गप्रेमी अनंत सुर्वे यांनी सांगितले. तालुक्यातील शेलटे गावाजवळ व वाडा-मनोर महामार्गाला लागूनच हा शिवकालीनपूर्व इतिहास असलेला किल्ला आहे. या किल्लय़ावर आजही काही ठिकाणी तटबंदी, शिवमंदिर, पाण्याच्या दोन भव्य टाक्या (कुंड), तोफा असे काही अवशेष शाबूत आहेत. हा किल्ला दुर्गप्रेमी व पर्यटकांचे आकर्षण असून कित्येक जण या किल्लय़ाला भेट देत असतात.  या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या दोन्ही टाक्यांमध्ये दगडी खांब आहेत.  टाक्यांमधील पाणी वर्षभर आटत नाही. अत्यंत शुद्ध असलेले हे पाणी या ठिकाणी येणारे पर्यटक पिण्यासाठी वापरतात, अशी माहिती मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 3:21 am

Web Title: quarrying of stone excavation hit the historic kohoj fort zws 70
Next Stories
1 ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने महिलेचा मृत्यू
2 बेकायदा तबेल्यांमुळे जलस्रोत प्रदूषित
3 ४१ लाखांची वीजचोरी
Just Now!
X