वन्यप्राण्यांबाबत प्रश्नचिन्ह

राखी चव्हाण, नागपूर</strong>

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाअंतर्गत सुरू असलेल्या इंडियन सफारीचे घोंगडे अजूनही भिजत पडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील प्रकल्पांपैकी एक असलेल्या या प्रकल्पात इंडियन सफारीकरिता आतापर्यंत चार वेळा मुदतवाढ देण्यात आली. आताही हे काम पूर्णत्वास आलेले नाही. अवघा एक महिना शिल्लक असताना ‘चेनलिंक फेन्सिंग’ कोसळली आणि आता या सफारीसाठी लागणाऱ्या वन्यप्राण्यांबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

डिसेंबर २०१५ च्या हिवाळी अधिवेशनादरम्यान या प्रकल्पातील रेस्क्यू सेंटर आणि एक गोरेवाडा सफारी सुरू करण्यात आली. या प्रकल्पात इंडियन सफारी, आफ्रिकन सफारी आणि नाइट सफारी अशा तीन सफारींची तरतूद होती. त्यातही इंडियन सफारीचे काम लवकर पूर्णत्वास येऊ शकते, हा दृष्टिकोन समोर ठेवून आधी ही सफारी पूर्णत्वास आणण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी निधी मोकळा केला. मात्र कामाची पद्धती आणि वेग पाहता, आता चौथ्यांदा दिलेल्या ‘डेडलाइन’च्या आत हे काम पूर्ण होईलच, याची शाश्वती नाही. १२५ हेक्टर क्षेत्रात हे काम होणार आहे, पण कमी वेळेत काम पूर्ण करण्याच्या नादात सफारीचाच एक भाग असलेले ‘चेनलिंक फेन्सिंग’ कोसळले. नेमके त्याच दिवशी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची समिती गोरेवाडय़ात होती. त्यासाठी प्राधिकरणाकडून गोरेवाडा प्रशासनाची कानउघाडणीही झाली. गोरेवाडा प्रकल्पात भागीदार असलेल्या एस्सेल समूहानेही याबाबत तक्रारीचा सूर आवळला. त्यानंतर सुधारणांसाठी उपाययोजना करण्याकरिता व्हीएनआयटीचा सल्ला घेण्यात आला, असे एस्सेल समूहाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

इंडियन सफारीकरिता गोरेवाडय़ाच्या बचाव केंद्रातील ‘रेस्क्यू अ‍ॅनिमल’ सोडण्याचे गोरेवाडा प्रशासनाने ठरवले. मात्र केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार आणि त्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘रेस्क्यू अ‍ॅनिमल’ सफारीसाठीच नाही तर नागरिकांनाही पाहण्यासाठी ठेवण्याचीदेखील परवानगी नाही. त्यामुळेच आता प्रशासन अडचणीत सापडले आहे. मुख्यमंत्र्यांकडून यापूर्वीही गोरेवाडा प्रशासनाला ‘डेडलाइन’ देण्यात आली होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांचा हा स्वप्नवत प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक आहे. बचाव केंद्रातील वाघ, बिबट सफारीकरिता सोडण्यासाठी काही मार्ग काढता येईल का याकरिता प्राधिकरणानेच एक समिती गठित केली आहे. या समितीच्या पाहणीनंतर आणि अहवालानंतरच इंडियन सफारीचा मार्ग निश्चित होणार आहे.

दरम्यान, सफारीच्या प्रवेशद्वाराचे काम गतीने सुरू असले तरीही उर्वरित सफारीच्या कामाची गती अतिशय संथ आहे. याबाबत वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. रामबाबू यांना विचारले असता, दिलेल्या मुदतीच्या आत इंडियन सफारीचे काम पूर्णत्वास जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अननुभवी व्यक्तीकडे आराखडय़ाचे काम

तत्कालीन वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या काळात गोरेवाडय़ाच्या कामासाठी सिंगापूर येथील प्राणिसंग्रहालयाच्या बर्नाड हेरिसनकडे काम सोपवण्यात आले होते. त्या वेळी हा प्रकल्प एक हजार कोटी रुपयांच्या घरात गेला होता. कालांतराने त्यांच्याकडून हे काम काढून घेण्यात आले. त्या वेळी प्राणिसंग्रहालयाचा आराखडा तयार करण्यासाठी नागपुरातील एका आर्किटेक्टने त्यांना मदत केली होती. आताही प्राणिसंग्रहालय आराखडा तयार करण्याचा अनुभव नसलेल्या व्यक्तीकडे त्याचे काम सोपवण्यात आले आहे. ‘चेनलिंग फेन्सिंग’च्या कामातील त्रुटी उघडकीस आल्यानंतर या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एस्सेल समूहाकडे जबाबदारी

सुभाषचंद्र गोयल यांच्या एस्सेल समूहाकडे एप्रिल २०१८ मध्ये गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय आणि सफारीच्या विकासाची जबाबदारी दिली आहे. यापूर्वी अनेकदा याबाबतच्या निविदा फसल्या. ४५० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या संपूर्ण विकासासाठी सहा वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. ८० वर्षांच्या भाडेतत्त्वावर एस्सेल समूहाकडे गोरेवाडय़ाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नव्या भागीदारीनुसार २५० कोटी रुपये एस्सेल समूह देणार आहे. यात वनविकास महामंडळाची भागीदारी ५१ टक्के आणि एस्सेल समूहाची भागीदारी ४९ टक्के राहील. सहा वर्षांनंतर महामंडळाचा वाटा ४० टक्के तर एस्सेल समूहाचा वाटा ६० टक्के राहील.