21 September 2020

News Flash

जिल्ह्यातील १० हजार खलाशांपुढे रोजगाराचा प्रश्न

बोटीवरील काम कधी सुरू होणार यांकडे लक्ष; काही खलाशांचा शेती करण्याकडे कल

बोटीवरील काम कधी सुरू होणार यांकडे लक्ष; काही खलाशांचा शेती करण्याकडे कल

नितीन बोंबाडे, लोकसत्ता

डहाणू : पालघर जिल्ह्य़ातील तलासरी, डहाणू, विक्रमगड, पालघर, जव्हार तालुक्यांतील दहा हजार खलाशांना रोजगारआभावी आर्थिक विवंचनेला तोंड द्यावे लागत आहे. चार महिन्यांपासून रोजगार नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या खलाशांच्या कुटुंबीयांना बेरोजगारी आणि उपासमारीचा सामना करावा लागत आहे. काम नसल्याने काही खलाशी शेतीकडे वळले आहेत, तर ज्यांना शेती नाही अशा काही खलाशांनी शेतमजुरीचा मार्ग स्वीकारला आहे. मासेमारी बोटी कधी सुरू होतील याकडे खलाशांचे डोळे लागले आहे.

नारळी पौर्णिमा सण झाल्यानंतर पालघर जिल्ह्य़ातील डहाणू, तलासरी, जव्हार, विक्रमगड, मोखाडा तालुक्यांतील आदिवासी मजूर गुजरातमधील वेरावळ, सौराष्ट्र, मंगळूर, कच्छ, ओखा बंदरांतील मच्छीमार बोटींवर स्थलांतर करतात. जवळपास आठ महिने बोटीवर काम करून मे-जून महिन्यात ते ८० हजार ते १ लाखापर्यंत पगार घेऊन गावी परततात. त्या रकमेवर खलाशी घरबांधणी, जुनी कर्जफेड, शेतीखर्च तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवला जातो. या भागातील एकाच कुटुंबातील दोन ते तीन सदस्य खलाशी म्हणून काम करताना दिसतात.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे एप्रिल-मे महिन्यांत शेकडो खलाशांना रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यामुळे खलाशांचे वर्षभराचे आर्थिक गणित कोलमडले आहे. परिणामी ज्यांची शेती आहे, त्यांनी आपला मोर्चा शेतीकडे वळवला. मात्र ज्यांच्याकडे शेती नाही, त्यांनी शेतमजूर म्हणून काम स्वीकारले आहे. आवणीनंतर शेतीचे काम नसल्याने आता हाताला काम नाही. परिणामी खलाशांना बोट मालकाकडून कर्जरूपाने उसनवारीने पैसे उचलावे लागले आहेत. त्यामुळे कर्जाचा डोंगर घेऊन खलाशांना घरीच रिकामी बसावे लागत आहे. उसनवारी परतफेड करण्यासाठी आणि हाताला काम मिळावे म्हणून घरी परतलेले खलाशी बोट पुन्हा सुरू होण्याकडे डोळे लावून बसले आहेत. मे महिन्यात सुखरूप घरी परतलेल्या खलाशांनी घर दुरुस्ती, शेतीकाम, तर काहींनी मजुरीची कामे केली. मात्र कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुन्हा बोटीवर जाण्याची तयारी काही खलाशांनी केली आहे. मात्र टाळेबंदीदरम्यान हालअपेष्ठा सोसलेल्या तरुणांनी कंपनी किंवा इतर मजुरी कामे करून घर चालवण्याची इच्छा काही खलाशांनी व्यक्त केली.

टाळेबंदीमुळे बोटीवरील काम बंद झाल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. बोटमालकाचा निरोप आल्यानंतर आम्ही पुन्हा बोटीवर काम करून संसाराचा गाडा पूर्वपदावर आणू.

– महेंद्र वाडकर, खलाशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2020 3:08 am

Web Title: question of employment for 10000 sailors in the palghar district zws 70
Next Stories
1 गुटखा तस्करीत पोलीस कर्मचारी?
2 गणेशभक्तांसाठी कोकणची वाट खडतरच
3 रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढते
Just Now!
X