28 September 2020

News Flash

सांगली बाजारात शाळवाचे दर गडगडले

रब्बी ज्वारीच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज

(संग्रहित छायाचित्र)

दिगंबर शिंदे

आवक नसतानाही सांगलीच्या बाजारामध्ये रब्बी ज्वारीचे म्हणजे शाळवाचे दर क्विंटलला पंधराशे रुपयांची गडगडले आहेत. सुगी सुरू झाल्याने नवीन ज्वारीची आवक होईल या भीतीने व्यापाऱ्यांनी शिल्लक ज्वारी बाजारात आणल्याने दर गडगडले असल्याचे सांगितले जात असले तरी यंदा परतीचा दमदार पाऊस झाल्याने शाळू पिकाचे उत्पादन चांगले होण्याच्या अपेक्षेने दर कमी झाले आहेत.

सांगली बाजार समितीमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये शाळू ज्वारीचे दर ३ हजार २०० ते ४ हजार ८०० रुपयांपर्यंत गेले होते. किरकोळ बाजारातही किमान ५० रुपये दराने बार्शी शाळू किलोने विकला जात होता.

शाळू दरामध्ये वाढ झाल्याने याचे परिणाम संकरित ज्वारीच्या दरावरही झाला होता. संकरित ज्वारी, सुवर्ण कार म्हणजेच नंद्याळ ज्वारीचा दरही ३५ रुपये किलोवर गेला होता.

मात्र या महिन्याच्या प्रारंभापासून शाळूचे दर घसरत आहेत. शुक्रवारी संपलेल्या आठवडय़ामध्ये शाळू ज्वारीचा किमान दर २ हजार ६९४ रुपये तर कमाल दर ३ हजार ७०० रुपये मिळाला.

मात्र आवक अवघी २३० क्विंटल आहे. नवीन शाळू पिकाची मळणी सुरू असल्याने नवीन ज्वारीची आवक पुढील आठवडय़ापासून सुरू होण्याच्या अपेक्षेने बाजारात शाळवाचे दर कोसळले आहेत.

उत्पादन वाढण्याची शक्यता

शाळूचे माहेरघर असलेल्या बार्शी, मंगळवेढा, जत आदी परिसरामध्ये यंदा परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शाळवाचे बंपर पीक येईल अशी अपेक्षा आहे. मागील वर्षी पावसाने पूर्ण दडी मारल्याने शाळवाची सुगी कोरडी गेली होती. त्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने शाळवाने पन्नाशी गाठली होती. यंदा मागणीपेक्षा पुरवठा जादा होईल या शक्यतेने दर कोसळले आहेत. मार्च अखेरीस शाळवाचे दर स्थिर होतील अशी शक्यता बाजारातील धान्य व्यापारी विवेक शेटे यांनी वर्तवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 12:58 am

Web Title: rabbi sorghum production is estimated to increase abn 97
Next Stories
1 मस्करीत तरुणाकडून रिव्हॉल्व्हरचा स्ट्रिगर दबून सुटली गोळी.. क्षणात खेळ खल्लास
2 कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येऊ देऊ नका-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
3 “आम्ही औरंगजेबाचे वंशज नाही, त्यामुळे औरंगाबादचं नाव बदललंच पाहिजे”
Just Now!
X