अनेक भागांतील जमिनीत ओलावाच नाही

अमरावती : यंदा पावसाच्या लहरीपणाचा परिणाम रब्बी हंगामातील पेरण्यांवर जाणवत असून अमरावती विभागात आतापर्यंत ३१ टक्केक्षेत्रातच पेरण्या आटोपल्या आहेत. यंदा हरभरा लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण आतापर्यंत ४५ टक्केच क्षेत्र हरभरा पिकाने व्यापले आहे.

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगामातील सरासरी लागवडीखालील क्षेत्र ६ लाख ४६ हजार हेक्टर असून आतापर्यंत २ लाख ६ हजार हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. खरीप हंगामाला पावसाच्या अनियमिततेचा फटका बसला, त्यामुळे रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची मदार होती. पण अनेक भागात जमिनीत ओलाव्याअभावी आणि सिंचनाच्या पुरेशा सोयी नसल्याने शेतकऱ्यांनी रब्बीत लागवड करण्यात फारसा उत्साह दाखवलेला नाही.

जमिनीत ओल चांगला असल्यास हरभरा पिकाच्या लागवडीला कृषी विभागाकडून प्रोत्साहन दिले जाते. गेल्यावर्षीच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा वाढला होता, पण यंदा मात्र तसे चित्र नाही. विभागातील पाच जिल्ह्यांत हरभरा लागवडीचे सरासरी क्षेत्र ३ लाख ९९ हजार हेक्टर असून त्यापैकी १ लाख ८१ हजार हेक्टर म्हणजे ४५ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रात हरभऱ्याचा पेरा झाला आहे. वाशीम जिल्ह्यात केवळ २८ टक्केच क्षेत्रात हरभऱ्याचे पीक आहे.

अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम हातचा गेला, पण रब्बी हंगामात खरिपातील आर्थिक तूट भरून काढण्याची संधीही निसर्गाने हिसकावून घेतली. गेल्यावर्षीच्या हंगामात गहू, हरभरा, भुईमूग, कांदा पिकाचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेण्यात आले होते, पण यावर्षी परिस्थितीने शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात सरासरी लागवडीखालील १ लाख ५७ हजार हेक्टरपैकी आतापर्यंत २२ हजार ९०५ हेक्टरमध्ये (१४ टक्के) रब्बीचा पेरा झाला आहे. अकोला जिल्ह्यात सरासरी १ लाख १२ हजार हेक्टरपैकी ३० हजार (२६ टक्के), वाशीम जिल्ह्यात ९२ हजार हेक्टरपैकी २३ हजार

(२४  टक्के), अमरावती जिल्ह्यात १ लाख ६९ हजार हेक्टरपैकी ४७ हजार (२८ टक्के), तर यवतमाळ जिल्ह्यातील सरासरी लागवडीच्या १ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ८३ हजार हेक्टर (७० टक्के) क्षेत्रात पेरणी झाली आहे.

विभागातील जलाशयांमधील पाण्याची पातळी कमालीची घसरली आहे. विहिरींची जलपातळी हिवाळ्यातच कमी झाल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे आहे. जमिनीत ओलच दिसत नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे टाळले आहे. ज्यांनी लागवड केली, त्यांच्यासमोर सिंचनाचा प्रश्न आहे. विभागातील लघुप्रकल्पांमध्ये पाणीसाठा कमी आहे.

ज्वारीचे क्षेत्रही घटले

रब्बी हंगामातील ज्वारीचे क्षेत्रही घटल्याचे चित्र असून विभागात २० टक्के क्षेत्रातच आतापर्यंत ज्वारीचा पेरा आटोपला आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये ज्वारीची लागवड कमी आहे. गहू पिकाखाली आतापर्यंत १० टक्के क्षेत्र आले आहे. सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांचा कल गहू लागवडीकडे असला, तरी गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याला पाणी कमी लागते. ज्या भागात कालव्याचे पाणी पोहोचले आहे, त्या भागात गव्हाला अधिक पसंती आहे.