28 February 2021

News Flash

एकवेळ गोबेल्स परवडला पण मोदी नाही, काँग्रेसची बोचरी टीका

शिवसेनेने आधी सत्तेतून बाहेर पडून दाखवावं मग अयोध्येला जाण्याच्या गोष्टी कराव्यात

मोदी सरकार हे खोटारडे सरकार आहे. १०० गोबेल्स मेले असतील तेव्हा भाजपाचा जन्म झाला असेल असे म्हणत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला आहे. गोबेल्स हा हिटलरच्या कार्यकाळात मंत्री होता. एक खोटे शंभरदा बोलले की ते खरे होते असे तो म्हणायचा. एकवेळ तो परवडला पण मोदी नाही अशा शब्दात विखे पाटील यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेचा दुसऱ्या टप्प्याची सुरुवात फैजपूर येथून झाली. त्यावेळी ते बोलत होते.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सडकून टीका केली. आधी या दळभद्री सरकारमधून बाहेर पडून दाखवा आणि मग अयोध्येला जाण्याची नौटंकी करा असे शिवसेनेला त्यांनी सुनावले आहे. शिवसेनेने आजवर २३५ वेळा सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे दिले. पण शेवटपर्यंत सत्ता सोडली नाही. हे सरकार लोकविरोधी, शेतकरी विरोधी आहे असे शिवसेनेला वाटत असेल तर त्यांनी तातडीने बाहेर पडून दाखवावे असे आव्हानच विखे पाटील यांनी दिले.

गांधीजींच्या आत्मचरित्राचे नाव ‘माझे सत्याचे प्रयोग’ आहे. मात्र गांधीजींचे नाव घेणारे हे सरकार सारे असत्याचेच प्रयोग करते आहे. मोदी स्वतःला चौकीदार म्हणवून घेतात. पण हे ‘जागते रहो’ म्हणण्याऐवजी ‘भागते रहो’म्हणणारे चौकीदार आहे. म्हणूनच विजय मल्ल्या, निरव मोदी, मेहुल चोक्सी देश सोडून पळाले. आता नितीन संदेसरा नावाचा आणखी एक ‘महापुरूष’ ५ हजार ७०० कोटी रूपयांचा घोटाळा करून पळून गेला. पण पंतप्रधान एक शब्द बोलायला तयार नाहीत. या सरकारकडे जनतेच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नाही, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

देशाच्या आणि राज्याच्या सोडा पण जळगाव जिल्ह्यातील प्रश्नांवरही या सरकारकडे उत्तर नाही. भाजपने दिलेले आश्वासन दिलेले केळी संशोधन केंद्र केव्हा स्थापन करणार? कापूस संशोधन केंद्र केव्हा तयार होणार? जळगावचे पोलीस प्रशिक्षण केंद्र का पळवले गेले?खान्देश विकास महामंडळ स्थापन करणार की नाही? अशा कोणत्याही प्रश्नाला हे सरकार उत्तर देत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्ह्याला न्याय देऊ शकणार नाही. एकनाथ खडसेंनी भाजपसाठी रक्त आटवले. पण जो भारतीय जनता पक्ष एकनाथ खडसेंचा होऊ शकला नाही, तो जळगाव जिल्ह्याचा काय होणार? असा सवाल करून स्व. मधुकरराव चौधरी यांच्या काळातील विकासाचे युग पुन्हा परत आणायचे असेल तर जळगाव जिल्ह्याने काँग्रेसला भरभरून पाठिंबा द्यावा, असे आवाहन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 7:08 pm

Web Title: radhakrishna vikhe patil criticized modi government and uddhav thakrey in his speech at sangharsh yatra jalgaon
Next Stories
1 पुण्यात पाणीबाणी ! पाणी पुरवठ्यात 15 टक्के कपात
2 मी असते तर कदमांना राम राम म्हटलं असतं- सुप्रिया सुळे
3 गुजरातला जमतं ते महाराष्ट्राला का नाही? , इंधन दरांवरुन धनंजय मुंडेंचा फडणवीसांना सवाल
Just Now!
X