विदर्भ दौऱ्यात राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

भाजप-शिवसेना युती शासनाला शेतकऱ्यांप्रती आस्था नाही. सध्या निर्माण झालेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांसाठी तिजोरी खुली करायला हवी असताना सरकारचा तिजोरीतील पैसे वाचवण्यावर भर असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

दुष्काळी परिस्थितीतील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी विखे पाटील अकोला व वाशीम जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी अकोला जिल्ह्य़ातील गांधीग्राम, किनखेड, उगवाफटा, कापशी, पातूर तालुक्यातील बाभूळगाव आदी गावांना भेटी दिल्या. स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांशी त्यांनी याप्रसंगी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, मेक इंडिया, स्टॉर्टअप इंडिया यात महाराष्ट्रातील गोरगरीब व सर्वसामान्यांना स्थान नाही. त्यामुळे मेक इन, स्टॉर्ट अपच्याऐवजी आता वाइंड अप अर्थात, यांनाच गुंडाळण्याची वेळ आली आहे. आगामी अधिवेशनात आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत. यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष हिदायत पटेल व माजी आमदार लक्ष्मण तायडे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. दौऱ्यात विखे पाटील यांच्यासोबत आमदार अमित झनक, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, वाशीम जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष दिलीप सरनाईक, लक्ष्मण तायडे, प्रा. अजहर हुसेन, दादाराव मते पाटील, डॉ. सुभाष कोरपे, प्रकाश तायडे,े साजिद खान पठाण आदी सहभागी झाले होते.