मराठा समाजाच्या आंदोलनात मुख्यमंत्री फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. मराठा समाजाच्या २३ सप्टेंबररोजी नगरमध्ये निघणा-या मोर्चाला माझा पाठिंबा असून मीदेखील या आंदोलनात सहभागी होईन अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे.
मराठा समाजाच्या मोर्चानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या नेत्यांची बैठक घेतली होती. यावरुन काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. अन्य समाजाला पुढे करुन काही जणांकडून राजकारण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शिर्डीत राज्यभरात निघणा-या मोर्चांना विखे पाटील यांनी पाठिंबा दर्शवला. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याशी मी सहमत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठा समाजाविरोधात दलितांनी प्रतिमोर्चे काढू नयेत. मराठा मोर्चा हा दलितविरोधी असल्याचा प्रचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून होत आहे. प्रतिमोर्चे हे दलितांच्या हितासाठी नव्हे तर संघाचे हस्तक म्हणून ठरतील असेही आंबेडकर यांनी म्हटले होते. या विधानाशी विखे पाटील यांनी सहमती दर्शवली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरही त्यांनी भाष्य केले. आत्तापर्यंत महापुरुषांचे स्मारक त्यांच्या निवासस्थानीच उभारले गेलेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचे स्मारकही त्यांच्या निवासस्थानीच करावे अशी मागणीही त्यांनी केली. राज्यात काही भागात अजूनही पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतक-यांचे नुकसान होत आहे. याबाबत राज्य सरकार उदासीन असून सरकारने नुकसानग्रस्त शेतक-यांचे पंचनामे करुन मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी व्हावी यासाठी मराठा समाजातर्फे राज्य भरात मोर्चा काढण्यात येत आहे. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी याठिकाणी मोर्चा काढण्यात आले आहेत. आगामी काळात पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर या शहरांमध्येही मोर्चे काढण्यात आले आहे. सध्या राज्यभरात मराठा समाजाकडून मोर्च्यांद्वारे करण्यात येत असलेल्या मागण्यांशी भारतीय जनता पक्ष पूर्णपणे सहमत असल्याचे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले होते. त्यामुळे मुंबई महापालिका आणि अन्य महापालिकांमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मराठा समाजाच्या आंदोलनावर जोमात राजकारण सुरु झाले आहे.