News Flash

निवडणूक निकालानंतर विखे-थोरात यांच्यात कलगीतुरा

थोरात व विखे यांच्यातील काँग्रेसअंतर्गत संघर्ष हा जिल्ह्य़ात कायमच चर्चेचा विषय आहे.

विखेंची भाजपशी हातमिळवणी-थोरात

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी जिल्ह्य़ातील काही तालुक्यात भाजपशी हातमिळवणी केली. विरोधी नेतेपद असताना भाजपला जवळ घेऊन राजकारण केले गेले. ज्यांच्याकडे पक्षवाढीची जबाबदारी पक्षाने मोठय़ा विश्वासाने सोपविली तेच पक्षविरोधी काम करत आहेत. आमच्या येथेही काँग्रेसविरोधी उमेदवारांना मदत करण्याचे काम केले गेले. पक्षहित आणि पक्षवाढीच्या दृष्टीने ही वाईट बाब आहे, असा थेट हल्ला माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी केला.

नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर ते बोलत होते. आक्रमकतेचे काहीसे वावडे असलेल्या थोरात यांच्या या थेट हल्ल्याने जिल्ह्य़ात खळबळ उडाली आहे.

थोरात व विखे यांच्यातील काँग्रेसअंतर्गत संघर्ष हा जिल्ह्य़ात कायमच चर्चेचा विषय आहे. थोरात हे एरवी थेट भाष्ट करण्याचे टाळतात. मात्र या हल्ल्याने हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

थोरात म्हणाले, याचे परिणामही या निवडणूक निकालात जिल्ह्णाातील पालिकांत दिसले. आपण मात्र कायम पक्षाहिताशी बांधिल राहिलो आहोत. यापुढेही पक्षवाढीसाठीच कटिबद्ध राहणार आहोत. काँग्रेस पक्ष आणि संगमनेरची जनता आपल्यावर सातत्याने विश्वास दाखवत आली आहे. या विश्वासाला आपण नेहमीच पात्र राहू. कामातील सातत्य, विश्वास, प्रामाणिकपणा यावर आधारीत सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आपण जोपासली आहे. संगमनेर नगरपालिकेत जनतेने विरोधकांची धूळधाण उडवून काँग्रेसवर विश्वास दाखविला आहे. संगमनेरचा पालिका विजय हा राज्यात काँग्रसला मिळालेला सर्वात मोठा विजय आहे. काही मंडळींनी कुटील डाव खेळण्याचा केलेला प्रयत्न जनतेनेच हाणून पाडला आहे. जनतेचे ऋण व्यक्त करतानाच शहरासह तालुक्याला राज्यात  अग्रेसर  करू, असे ते म्हणाले.

त्यांच्याच निष्ठा तपासण्याची वेळ-विखे

काँग्रेसच्या माध्यमातून मोठी पदे भोगल्यानंतरही नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना जिल्ह्य़ात अन्यत्र आणि जिल्ह्य़ाबाहेर जाता आले नाही. कुटीलनितीचा आरोप करणाऱ्यांच्या मनात कटूता आहे. त्यांच्याच निष्ठा आता तपासण्याची वेळी आली आहे. शहरामध्ये जनाधार कमी होत असल्याचे खापर आमच्या माथी का फोडता, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना केला.

विखे म्हणाले, नगरपालिका निवडणुकीत मी राहाता, शिर्डीसह, कोपरगाव, पाथर्डी, देवळाली प्रवरा याठीकाणी काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांना उमेद देऊन निवडणुकीत उभे केले. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नही केले. असे असताना थोरात यांना कोणती काँग्रेस अभिप्रेत आहे, हे समजत नाही. शकुंतला थोरात या काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करुन विधानसभेत निवडून आलेल्यांनी आता स्वरतच्याच पक्ष निष्ठा तपासण्याची खरी गरज आहे. कुटील नितीचा वापर करुन संगमनेरच्या निवडणुकीत कोणी किती पैशांचा वापर केला, हे संगमनेरची जनता निश्चित सांगू शकेल.

माझ्या विधानसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघात जोडल्याच गेलेल्या संगमनेर तालुक्यातील गावांमध्ये त्यांचेच कार्यकर्ते शिवसेनेचे झेंडे आणि फलक उघडपणे घेऊन माझ्या विरोधात काम करत होते. या घटना ताज्या आहेत. मी काँग्रेसचे काम करतो की भाजपबरोबर जातो, याबाबत माझ्यावर आरोप करण्याकपेक्षा इतकी वर्ष शासनामध्ये ज्यांना मोठेमोठी पद मिळाली, मंत्रीपद ज्यांनी भोगली ते संगनेरच्या बाहेर कोणत्यान नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचारार्थ गेले. जिल्ह्णाात तर गेलेच नाहीत जिल्ह्णााबाहेर गेला असाल ते तरी सांगा असा सवाल करुन, कोणत्या काँग्रेस उमेदवारांना तुम्हीे निवडणुकीत उभे केले, निवडणुकीत जिल्ह्णाातील कोणत्या कार्यकर्त्यांना मदत केली, याचा लेखाजोखा त्यांनी एकदा मांडावाच. त्यांच्या निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर, तुमच्या कमी झालेल्या जनाधाराचे खापर आमच्या माथी का फोडता, असा सवालही विखे यांनी थोरात यांना केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 1:40 am

Web Title: radhakrishna vikhe patil vs balasaheb thorat
Next Stories
1 सिंधुदुर्गात राणे-केसरकरांना धक्का
2 रायगडमध्ये राष्ट्रवादीची पीछेहाट, शिवसेना-भाजपचा शिरकाव
3 नगर जिल्हय़ात भाजपची बाजी
Just Now!
X