22 October 2020

News Flash

देशाचा चौकीदारच चोर बनला आहे- विखे

शाचा चौकीदारच चोर बनला आहे. तो आणि भाजप मिळून देशाच्या तिजोरीवर दरोडा घालत आहेत.

राफेल विमान खरेदी घोटाळा, इंधन दरवाढ व महागाई याचा निषेध करण्यासाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चापुढे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे भाषण झाले.

जिल्हा काँग्रेसचा निषेध मोर्चा

नगर : देशाचा चौकीदारच चोर बनला आहे. तो आणि भाजप मिळून देशाच्या तिजोरीवर दरोडा घालत आहेत. राफेल विमान खरेदी घोटाळय़ाबाबत चौकीदार एक शब्दही बोलताना दिसत नाही, त्यामुळे संसदीय समितीमार्फत विमान खरेदीची चौकशी करावी, अन्यथा काँग्रेस देशभर तीव्र आंदोलन करून केंद्र सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिला.

राफेल विमान खरेदी घोटाळा, इंधन दरवाढ, महागाई याचा निषेध करण्यासाठी व त्याबद्दल केंद्र व राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी आज, मंगळवारी विखे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला त्या वेळी विखे बोलत होते.

माजी मंत्री अण्णासाहेब शेलार, आ. भाऊसाहेब कांबळे, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार, महिला जिल्हाध्यक्ष कांचन मांढरे, अंबादास पिसाळ, राहुल झावरे, बाळासाहेब हराळ, निखिल वारे, उबेद शेख, कुलदीप भिंगारदिवे, अभय आव्हाड, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या वेळी विखे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, चौकीदार म्हणणारेच देशाची फसवणूक करू लागले आहेत. पारदर्शकतेचा आव आणून चौकीदार, भाजप व अंबानी स्वत:चे खिसे भरत आहेत. चौकीदार झोपलेला व भ्रष्टाचाराखाली दबला असल्यानेच देशाच्या सीमा असुरक्षित झाल्या आहेत. सर्जिकल स्ट्राईकनंतर सर्वाधिक जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानचे धाडस रोज वाढते आहे. राष्ट्रभक्तीचा गवगवा करणारे याची जबाबदारी स्वीकारणार आहेत का, उलट विमान घोटाळय़ाकडे लक्ष वेधणाऱ्या राहुल गांधींवर भाजपने आरोप सुरू केले आहेत.

इंधन दरवाढ नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे, यासाठी पेट्रोल, डिझेलचा समावेश जीएसटीमध्ये करावा, अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्र सरकारला कर कमी करून इंधनाचे दर किमान १५ ते २० रुपये कमी करणे शक्य आहे, परंतु सरकारचे नागरिकांकडे लक्ष नाही, त्यातून इंधन दरवाढ व महागाईकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने त्यांना चलेजाव म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीकाही विखे यांनी केली.

थोरात गट अनुपस्थित

केंद्र सरकारविरुद्धचा मोर्चा हा काँग्रेसचा देशव्यापी कार्यक्रम होता, त्यामुळे आजचा मोर्चा काढताना जिल्हा काँग्रेसमधील नेत्यांचे एकीचे दर्शन घडेल, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र नगर शहर जिल्हाध्यक्षांसह थोरात गटाचे सर्वच प्रमुख नेते व पदाधिकारी मोर्चाला अनुपस्थित होते. त्यामुळे नगरच्या महापालिकेच्या निवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी आज आयोजित करण्यात आलेली पक्षाची बैठकही रद्द केली गेली. आता ही बैठक दि. ३० रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 3:12 am

Web Title: radhakrishna vikhe slam pm narendra modi over rafale deal
Next Stories
1 काँग्रेसच्या निषेध मोर्चात आमदारांचा खिसा कापला!
2 वाघिणीला पकडण्यासाठी नव्याने मोहीम
3 विनयभंग प्रकरणी ४८ तासांत निकाल
Just Now!
X