News Flash

काँग्रेस नेते लाचार, मी पक्ष सोडला म्हणून थोरातांना पद मिळालं; विखे पाटलांची टीका

शिवसेनेने विचार करण्याची वेळ आली आहे

राज्यात सत्ता स्थापन होऊन सहा महिने लोटले आहेत. राज्यात सत्तेत सहभागी असलेला काँग्रेस पक्ष नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू झाली होती. त्यावर लगेच पडद्या पडला. मात्र, यावरून भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. “स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसचे नेते लाचार झाले असून, मी पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना अध्यक्ष पद मिळाले. त्यांची स्वतःची कर्तबगारी काय?”, अशी टीका विखे पाटील यांनी केली.

महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. काही दिवसांपूर्वी सरकारमधील सहभागीदार असलेला काँग्रेस पक्ष नाराज असल्याची चर्चा समोर आली होती. या चर्चेवरून विखे पाटील यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. न्यूज १८ लोकमतशी बोलताना विखे यांनी भूमिका मांडली.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “मी पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना अध्यक्षपद मिळालं. थोरातांची स्वतःची कर्तबगारी काय? थोरात म्हणजे दिशा हरवलेला माणूस आहे. गेल्या सहा महिन्यात त्यांनी अशी कोणती कर्तबगारी दाखवली. राज्यातील जनतेच्या प्रश्नासाठी बैठक होत नाही, तर आपापसातील वाद मिटवण्यासाठी बैठका होत आहे. काँग्रेसला इतकी लाचारी का करावी लागत आहे? स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसचे नेते लाचार झाले आहेत. राज्यात काँग्रेसची वाताहत झाली आहे,” अशी टीका विखे पाटील यांनी केली.

शिवसेनेवर विचार करण्याची वेळ आली आहे…

शिवसेनेविषयी विखे पाटील यांनी भाष्य केलं. “राज्यात करोनासारखं मोठं संकट असताना राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहे. कोणताही निर्णय घेताना सरकारमधील तिन्ही पक्षात समन्वय नाही. राज्य सरकारच आज संभ्रमात आहे. मातोश्रीचा रिमोट आता शिवसेनेच्या हातात राहिलेला नाही. सत्तेच्या वाटमारीत शिवसेनेचं मोठं नुकसान होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही मोठी फरफट होताना दिसत आहे. त्यामुळे आता सत्तेत राहायचं की नाही याचा शिवसेनेनं विचार करण्याची वेळ आली आहे”, असंही विखे पाटील म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 3:42 pm

Web Title: radhakrushn vikhe patil slam to balasaheb thorat bmh 90
Next Stories
1 राज्यात ४८ तासांत १४० पोलीस करोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू
2 पासपोर्ट धारकांनो काळजी घ्या; सायबर विभागानं केलं महत्वाचं आवाहन
3 “पहिले मुंबईत पुढचा शिवसेनेचा महापौर तरी बसवा, मग…”; नितेश राणेंचा शिवसेनेला टोला
Just Now!
X