जिल्ह्य़ातील केज तालुक्यातील काळेगावघाट येथे राज्य परिवहन महामंडळाच्या वाहकाच्या घरी झालेल्या रेडिओचा स्फोट दहशतवादी कृत्य असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवारी दुपारी झालेल्या या घटनेची दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि स्थानिक पोलीस कसून तपासणी करत असतानाच दिल्लीहून राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) एक तुकडीही शनिवारी घटनास्थळी दाखल झाली. मात्र या स्फोटामागील कारणांचा फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच खुलासा होणार आहे.
केज तालुक्यात असलेल्या काळेगावघाट येथे शुक्रवारी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहकाच्या घरात रेडिओ बॉम्बचा स्फोट झाला. अंबाजोगाई-मुंबई गाडीत एक पार्सल बेवारस राहिल्यानंतर वाहक ओम निंबाळकर यांनी ते आपल्या घरी नेले व त्यातील रेडिओमध्ये सेल टाकून तो सुरू करताच स्फोट झाला. यात ओम निंबाळकर, त्यांची पत्नी उषा, आई कुसुम व मुलगा कुणाल (वय २) गंभीर जखमी झाले.  प्राथमिक उपचारानंतर शनिवारी पुढील उपचारासाठी जखमींना मुंबईस हलविण्यात आले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या घटनेने गृह विभाग हादरला आहे. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय प्रथमदर्शनी व्यक्त होत असून औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार जिल्ह्य़ात तळ ठोकून आहेत. शुक्रवारी दाखल झालेले एटीएसचे पथक आणि दिल्लीहून आलेली एनआयएची तुकडी घटनास्थळी तपास करत आहे. बेवारस पार्सलजवळ    केंद्रेवाडी नाव असलेली चिठ्ठी होती.  ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी केंद्रेवाडी गावाबाबत चौकशी सुरू केली. उस्मानाबादच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने स्फोटकांच्या अवशेषांचे नमुने घेतले असून, त्याचा अहवाल शनिवारी रात्री उशिरा मिळण्याची अपेक्षा असल्याचे नवीनचंद्र रेड्डी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून बीडचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक व अपर पोलीस अधीक्षक माधव कारभारी केजमध्ये तळ ठोकून आहेत. स्फोट होऊन २४ तासांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरी पोलिसांना अजूनही तपासाची दिशा अथवा कसलेही सूत्र मिळालेले नाही.