ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील छोटी तारा या वाघिणीच्या दोन वर्षांच्या दोन छाव्यांना  ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात आले. गेल्या चार वर्षांत एकूण १३ वाघांना रेडिओ कॉलर लावण्यात आली असून यामध्ये ताडोबातील छोटी तारा, गब्बर, कोळसा येथील नर व मादी आणि छोटी ताराच्या दोन छाव्यांचा समावेश आहे.

भारतीय वन्यजीव विभाग, डेहराडूनने भारतातील निवडक व्याघ्र प्रकल्पातील वाघांना रेडिओ कॉलर लावून त्यांच्यावर लक्ष्य ठेवून अभ्यास करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. याच कार्यक्रमांतर्गत ताडोबा व्याघ्र प्रकल्पात शनिवारी सायंकाळी पाच वाजता छोटी तारा वाघिणीच्या पिल्लांना जामनी परिसरात  भारतीय वन्यजीव विभागाचे  शास्त्रज्ञ व अभ्यासक डॉ. हबीब बिलाल, डॉ. पराग निगम व वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के. मिश्रा  यांच्या नेतृत्वात रेडिओ कॉलर लावण्यात आले. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ११ वाजता छोटी ताराच्या दुसऱ्या छाव्याला बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन देऊन रेडिओ कॉलर लावण्यात आले, असे  ताडोबाचे क्षेत्र संचालक मुकुल त्रिवेदी यांनी सांगितले.

रेडिओ कॉलर लावलेले छोटी ताराचे दोन्ही छावे नर आहेत. कॉलर लावल्यानंतर दोन्ही छावे जंगलात सोडण्यात आले आहेत. ताडोबात आतापर्यंत सहा वाघांना रेडिओ कॉलर लावले आहे. विशेष म्हणजे, रेडिओ कॉलर लावल्यानंतरही वाघांची शिकार झाल्याच्या घटनाही गेल्या काही वर्षांत समोर आलेल्या आहेत. रेडिओ कॉलर लावल्यानंतरही वाघ सुरक्षित नाही ही वस्तुस्थिती बोर व चपराळाच्या घटनेतून समोर आली. त्यानंतर छोटी ताराच्या या दोन छाव्यांना रेडिओ कॉलर लावण्यात आली आहे.