आजही अनेकांचा दिवस उजाडतो तो आकाशवाणीच्या चिरपरिचित संगीताने. पुण्याच्या आकाशवाणी केंद्रावरून सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी प्रसारित केल्या जाणाऱ्या बातम्यांची वेळ साधून अनेक जण आपापली घडय़ाळे लावतात आणि ‘विविध भारती’वर तासातासाला दिल्या जाणाऱ्या बातमीपत्रांच्या वेळीही श्रोत्यांचा घडय़ाळ तपासून पाहण्याचा ‘सिलसिला’ सुरूच राहतो. पुणेकरांच्या लाडक्या आकाशवाणीचा प्रादेशिक वृत्त विभागच आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सकाळी ७. १० वाजताच्या बातम्या आता पुण्याहून प्रसारित न होता मुंबईहून प्रसारित होणार असून विविध भारतीच्या पुणे केंद्रावरील दोन मिनिटांची बातमीपत्रेही बंद होणार आहेत.
केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका आदेशानुसार पुण्याच्या प्रादेशिक वृत्त विभागातील ‘उपसंचालक’ आणि ‘वृत्त संपादक’ ही दोन्ही पदे अनुक्रमे श्रीनगर व कोलकात्याला हलवण्यात येणार आहेत. तसेच वृत्त विभागात नवीन पदे भरली जात नसल्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. आकाशवाणीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार विभाग बंद झाल्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भरल्या गेलेल्या पदांव्यतिरिक्त इतर पदे आपोआपच अतिरिक्त ठरतात आणि जिथे रिक्त पदे असतील तिथे या कर्मचाऱ्यांना पाठवले जाते. त्यासाठी वेगळा आदेश काढावा लागत नाही. अंतिमत: विभाग बंद होतो. आकाशवाणीच्या वृत्त विभागाचा सर्व कारभार कंत्राटी ‘वृत्त वाचक व अनुवादकां’वर चालतो. विभाग बंद झाल्यावर या कंत्राटी वाचकांवरही गंडांतर येणार आहे.

पुणेकर कशाला मुकणार?
– सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी पुणे केंद्रावरून राज्यभर प्रसारित होणाऱ्या बातम्या हा पुणेकरांच्या सांस्कृतिक जिव्हाळ्याचा विषय आहे. पुण्याने आकाशवाणीला अनेक उत्कृष्ट बातमी वाचक दिले आणि त्यांचे आवाज आकाशवाणीची ओळख बनले. ही ओळख आता पुसली जाऊन मुंबई वा इतर केंद्रांवरून सहक्षेपित होणाऱ्या बातम्या पुणेकरांना ऐकायला मिळतील.
– विविध भारतीच्या पुणे केंद्रावरील प्रायोजित कार्यक्रमांचे प्रमाण वाढते असल्याचा आक्षेप पुणेकर श्रोत्यांकडून वारंवार घेतला जातो. विविध भारतीवर सकाळी तीन वेळा व संध्याकाळी एकदा प्रसारित होणारे बातमीपत्रही बंद झाले, तर ही वाहिनी प्रायोजित कार्यक्रमांपुरतीच उरेल की काय, ही भीतीही या निमित्ताने अधोरेखित होत आहे.

‘पीआयबी’ पाठोपाठ आकाशवाणी!
गेल्या महिन्यात पुण्याच्या ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो’साठीही (पीआयबी) पदे हलवण्याबद्दल असाच आदेश प्रसिद्ध झाला होता व पुढच्या काहीच दिवसांत पीआयबीतील दोन्ही प्रमुख पदे दुसऱ्या ठिकाणी हलवली गेली. पुण्यातील ‘पीआयबी’चा गाशा गुंडाळण्यास सुरुवात झाली असल्याची चर्चा त्या वेळी रंगली होती. तीच वेळ आता आकाशवाणीवर आली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.