28 September 2020

News Flash

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नभोवाणी, दूरचित्रवाणीचा आधार

जिल्ह्यातील ४७,८९० विद्यार्थ्यांकडून लाभ; संगणक, मोबाइल इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या कमी

जिल्ह्यातील ४७,८९० विद्यार्थ्यांकडून लाभ; संगणक, मोबाइल इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या कमी

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी शिक्षणासाठी दूरचित्रवाणी (टीव्ही) आणि नभोवाणीचा (रेडिओ) आधार घेत असल्याची माहिती समोर येत आहे. ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असल्याने या विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी हा पर्याय निवडला आहे. याउलट संगणक व मोबाइल इंटरनेट डाटा वापरणाऱ्या विद्यर्थ्यांची संख्या कमी आहे.

जिल्हा शिक्षण विभागातर्फे विविध तालुक्यांमध्ये ऑनलाइन शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांसाठी सुरू असल्याची बतावणी करण्यात येत असली तरी जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी नभोवाणी व दूरचित्रवाणीच्या आधारे शिक्षण घेत आहेत. पालघर जिल्ह्यातील सुमारे एक लाख ७२ हजार विद्यार्थ्यांपैकी ४७ हजार ८९० विद्यार्थी टीव्ही, रेडिओचा आधार घेत शिक्षण घेत असल्याचे शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणावरून समोर आले आहे.

करोनाकाळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे काम जून महिन्यापासून सुरू करण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागातील सर्वच विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने ते ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित होते. पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २१३१ शाळा आहेत. या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांपैकी या शाळांमध्ये मात्र एकूण २२ हजार ३१५ विद्यार्थ्यांकडे मोबाइलद्वारे शिक्षण घेण्याची सुविधा आहे. ७,२९७ विद्यार्थ्यांकडे संगणकाद्वारे ऑनलाइन शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध होती, तर शिक्षणासाठी संगणक व मोबाइल वापरणाऱ्या विद्यर्थ्यांपेक्षा टीव्हीचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या  ३५,११० आहे. रेडिओचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १२,७८९ आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षण घेत असलेल्या एक लाख ७२ हजार १८७ विद्यार्थ्यांपैकी ७७ हजार ५११ विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेत असले तरी ९४ हजार ६७६ विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून आजही वंचित आहे ही गंभीर बाब आहे.

शासनाने दूरदर्शन वाहिनीवर आणि रेडिओद्वारे शैक्षणिक धडे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पालघर जिल्ह्यात ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणात अडथळा येऊ  नये यासाठी टीव्ही आणि रेडिओद्वारे आपले शिक्षण सुरू केले. शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

‘शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी’

विद्यर्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकली जाऊ  नये यासाठी पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात शिक्षकांनी ‘शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी’ हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाअंतर्गत शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिकवणार असल्याने विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे धडे घरीच मिळणार आहेत.

* जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा : २,१३१

* जिल्ह्यातील एकूण विद्यर्थी संख्या:      १,७२,१८७

* रेडिओद्वारे शिक्षण घेणारे विद्यार्थी :     १२,७८९

* संगणकाद्वारे शिक्षण घेणारे विद्यार्थी :   ७,२९७

* मोबाइलद्वारे शिक्षण घेणारे विद्यार्थी :   २२,३१५

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 1:41 am

Web Title: radio television support for education to students zws 70
Next Stories
1 गावी पाठवत नसल्याने युवतीची आत्महत्या
2 विदर्भात सिंचनासाठी निधीची चणचण!
3 वेगवान वाऱ्यांसह कोकणात संततधार
Just Now!
X