राफेल करारासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या पध्दतीने बोफोर्ससंदर्भात जनतेने निर्णय घेतला, तसाच आता राफेलबाबातही जनताच निर्णय घेईल, असे त्यांनी म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला असला तरी संसदेत यावरुन गदारोळ होईलच, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी राफेल करारासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून या करारात अनियमितता आढळली नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. या निर्णयामुळे राफेल करारावरुन मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्याचा विरोधकांचा प्रयत्न फसला आहे. या निकालावर संजय राऊत यांनी पंढरपूरमध्ये प्रतिक्रिया दिली. सर्वोच्य न्यायालयाने दिलेला निर्णय योग्यच आहे. बोफोर्स प्रकरणात जसा जनतेने निर्णय दिला होता, तसाच आता राफेल प्रकरणातही जनताच निर्णय देईल, असे त्यांनी सांगितले.

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या पंढरपूर दौऱ्याचीही माहिती दिली. २४ डिसेंबर रोजी उध्दव ठाकरेंची महासभा होणार आहे. ही सभा ऐतिहासिक होईल. ‘ न भूतो न भविष्यती ‘ अशी गर्दी या सभेला होईल. अयोध्येमधे शरयू किनारी जशी आरती झाली. तशीच पंढरपूरच्या चंद्रभागेच्या आरतीचा सोहळादेखील होणार आहे. याप्रसंगी राज्यातील अनेक साधु-संत महंत उपस्थित राहतील, असे त्यांनी सांगितले. पंढरीचा पांडुरंग हा कष्टकरी , शेतकरी , मजूरांचे दैवत आहे. आणि शिवसेना देखिल अशाच कष्टकरी मजूरांसाठी काम करीत आहे. २०१९ लागेल सेनेचे सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.