‘ज्या राहुल गांधी यांची सत्ताधारी भाजपाकडून नेहमी चेष्टा केली जात होती, त्या राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावर संसदेत भूमिका मांडली असून या राफेलमध्ये भाजपा अडकली आहे. या राफेलमध्ये हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या राष्ट्रीय प्रश्नावर देशाचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलण्याची गरज आहे. मात्र ते कुठेच दिसत नाही किंवा बोलत नाही. त्यामुळे राफेल प्रकरणावर पंतप्रधान घाबरलेले आहेत, म्हणून ते बोलत नाही’. अशा शब्दात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नावर भूमिका देखील मांडली. यावेळी सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, केंद्रात सत्तेमध्ये येण्यापूर्वी भाजपकडून अनेक आश्वासने देण्यात आली. त्यातील कोणत्याही प्रकारची आश्वासने पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्याचा राग पाच राज्याच्या निवडणुकीतून जनतेने दाखवला आहे. याचे परिणाम भाजपाला लोकसभेच्या निवडणुकीत नक्कीच दिसतील, अशा शब्दांत त्यांनी भाजपावर टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौर्‍याबाबत ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूरमध्ये येत आहेत. चांगली गोष्ट असून ते मी केलेल्या कामाच्या उदघाटनाला येत आहेत. असा शिंदे यांनी पंतप्रधानांना टोला लगावला. शिंदे पुढे म्हणाले की, मध्यंतरी एका कार्यक्रमात मोदींनी मी सोलापूरचे जॅकेट घातले आहे, असं म्हटलं होतं. त्यांच्या त्या विधानाची चौकशी सोलापूरमध्ये केल्यावर अशा प्रकारचे जॅकेट सोलापूरात बनत नाही, असं समजलं यातून पुन्हा मोदी यांनी पुडी सोडल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीकाही शिंदे यांनी यावेळी केली.

राज्यात शेतकरी वर्गाला दुष्काळ परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यावर ते म्हणाले की, राज्याचा मी मुख्यमंत्री असताना दुष्काळावर तात्काळ चारा छावण्या आणि सर्व मदत शेतकर्‍यांना करण्यात आली. मात्र सध्याचे सरकार आणि मुख्यमंत्री हे दुष्काळी भागाची केवळ पाहणी करीत असून अद्याप शेतकर्‍यांसाठी उपाय योजना करण्यात आल्या नाही. शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली.