आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्यात येत असलेले काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा नागपूर दौरा बंद दाराआडील बैठक, अतिसुरक्षा आणि मंत्र्यांच्या झाडाझडतीमुळेच गाजला. मतभेद मिटवून निवडणूक जिंकण्यासाटी कामाला लागण्याचा कानमंत्र राहुल यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. मात्र, कार्यकर्त्यांशी त्यांनी कोणताही संवाद साधला नाही. तर अतिसुरक्षा व्यवस्थेमुळे खासदार, आमदारांनाही तब्बल एक किमीची पायपीट करून ‘युवराजां’चे दर्शन घ्यावे लागले.
सहा तासांच्या नागपूर दौऱ्यासाठी राहुल गांधींचे सकाळी आगमन झाले. मात्र, त्यांच्याभोवती कडेकोट सुरक्षा असल्याने स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना विमानतळाबाहेरच रोखण्यात आले. राहुल गांधींची बुलेटप्रुफ कार आणि सोबतच्या सुरक्षा रक्षकांचा ताफा विमानतळावरून थेट अमरावती मार्गावरील सुराबर्डी मिडोज या पंचतारांकित लाऊंजच्या दिशेने रवाना झाला. सुराबर्डीत तर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचा अतिरेक झाल्याचे चित्र होते. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना बैठकीच्या स्थळापासून तब्बल दोन किलोमीटर अंतरावरच रोखून धरण्यात आले. बैठकस्थळाची एसपीजीचे कमांडो, पोलीस आणि साध्या वेशातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अक्षरश: घेराबंदी केल्याने परिसराला बंदिस्त किल्ल्याचे स्वरुप आले होते. फक्त ३० वाहनांना लाऊंजच्या परिसरात प्रवेश देण्यात आला. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील लोकप्रतिनिधींच्या गाडय़ादेखील १ किलोमीटरवरच रोखण्यात आल्याने खासदार आणि आमदारांना पायपीट करत बैठकीच्या स्थानी पोहोचण्याची वेळ आली.
कलावतीशी चर्चा
सुराबर्डीत राहुल गांधींना सेवादल पथकाने सलामी दिली. यावेळी ग्रामीण भागातील काही महिलांना परिसरात येण्याची अनुमती देण्यात आली होती. यात यवतमाळातील शेतकरी विधवा कलावतीचाही समावेश होता. राहुल गांधींनी याच कलावतीची सहा वर्षांपूर्वी भेट घेतल्याने ती देशभर चर्चेत आली होती. कलावतीने गांधींशी दोन मिनिटे संवाद साधून आता ती स्वत:च्या पायावर उभी असल्याचे सांगितले.

वरिष्ठ नेत्यांची कानउघाडणी
राहुल गांधी यांनी पदाधिकाऱ्यांशी केलेल्या बैठकीदरम्यान जिल्हा आणि ब्लॉक पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी खासदार, आमदार आणि मंत्र्यांच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचला. याची दखल घेऊन त्यांनी साऱ्यांचीच झाडाझडती घेतली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना बैठकीत प्रवेश नव्हता. त्यामुळे दोन्ही नेते बाजूच्या सूटमध्येच बसून होते.