काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी धामणगाव रेल्वे तालुक्यात भर उन्हात पदयात्रा करून शेतकरी कुटुंबांचे सांत्वन केले खरे, पण २००६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी ज्या ठिकाणी शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांसाठी ‘पॅकेज’ जाहीर केले, त्याच भागात राहुल गांधींना शेतकरी विधवांचे अश्रू पुसण्यासाठी यावे लागणे, हा आगळा ‘काव्यात्मक न्याय’ ठरला आहे.
चिरंजीवांची चिवचिव
भाजप सरकारांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष
राहुल यांच्या प्रवासात अतिउत्साहींमुळे मनस्ताप
राहुल गांधी गुरुवारी सकाळीच धामणगाव रेल्वे तालुक्यातील गुंजी या १२०० लोकवस्तीच्या गावात पोहोचले, तेव्हा संपूर्ण गाव काँग्रेस पक्षांच्या झेंडय़ांनी सजून गेले होते. आत्महत्या करणाऱ्या गावातील दोन शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांनी कुटुंबांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांची पदयात्रा सुरू झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेस नेते मोहन प्रकाश, राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, धामणगावचे आमदार वीरेंद्र जगताप, तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक नेते पदयात्रेत सहभागी झाले होते. पदयात्रेत काँग्रेस कार्यकर्त्यांचाच भरणा अधिक होता. राहुल गांधी यांच्या निकट पोहोचण्याच्या स्पध्रेत अनेक ठिकाणी प्रचंड रेटारेटी झाली. विशेष संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांचे सुरक्षा कडे भेदून अनेक कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत होते.
चार किलोमीटर पायी चालून ते शहापूरला पोहोचले. या गावात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी त्यांनी भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. तेथून मात्र कडक उन्हाने पदयात्रेत सहभागी झालेल्यांची परीक्षाच घेतली. दुपारी ते रामगाव येथे पोहोचले आणि आत्महत्या करणाऱ्या एका शेतकऱ्यांच्या घरी ते गेले. या गावात पदयात्रेचा समारोप झाला. रामगाव ते राजना हा १३ किलोमीटरचा प्रवास नंतर त्यांनी वाहनातून केला. दोन महिन्यांपूर्वी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्यांनी त्याच्या कुटुंबाशी आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली. तेथून कारनेच ते चांदूर रेल्वे तालुक्यातील टोंगलाबादला पोहोचले. गेल्या वर्षभराच्या कालावधीत आत्महत्या करणाऱ्या गावातील चार शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांचे सांत्वन केले. राहुल गांधी यांची १३ किलोमीटरची पायदळवारी हा या परिसरात चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय झालेला होता.