24 February 2021

News Flash

उद्धव ठाकरेंनंतर राहुल गांधी यांची आदित्य ठाकरेंशी चर्चा; मुंबईतील परिस्थितीविषयी दिला सल्ला

मुंबईतील वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना फोन केला. राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कामाबद्दल आणि करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात चर्चा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी मुंबईतील करोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर महत्त्वाची सूचनाही केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात मंगळवारी फोनवरून चर्चा झाली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशीही फोन करून संवाद साधल्याचं वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना राज्यातील सरकारमध्ये काँग्रेसच्या सहभागाविषयी महत्त्वाचं विधान केलं होतं. त्या विधानाचा विपर्यास केल्याचा खुलासा त्यांनी नंतर केला. मात्र, तोपर्यंत राज्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. चर्चांचे पेव फुटल्यानंतर मंगळवारी रात्री राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती.

उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरे यांनाही फोन केला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय आणि करोनाबद्दल चर्चा झाली. राहुल गांधी यांनी करोनाचा प्रसार थांबवण्याबरोबर करण्यात येत असलेल्या इतर उपाययोजनांबद्दल आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. “मुंबई महानगरातील लोकसंख्या खूप आहे. मुंबईतील वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. मात्र, आपण स्क्रिनिंग आणि टेस्टिंगचं प्रमाण वाढवायला हवं. महाराष्ट्र सरकार सध्या चांगलं काम करत आहे,” असं राहुल गांधी आदित्य ठाकरे यांना म्हणाले.

राहुल गांधी-उद्धव ठाकरेंमध्ये काय झाली होती चर्चा?

राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोन करून संवाद साधला होता. “शिवसेना आणि काँग्रेसमधील मैत्री कायम आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या संकटाच्या काळात काँग्रेस प्रत्येक निर्णयात सरकारसोबत आहे,” अशी ग्वाही राहुल गांधी यांनी ठाकरे यांना दिली होती. तर “सरकारमध्ये काँग्रेसचा सन्मान ठेवला जाईल. सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सहभागी करून घेण्याचीच भूमिका आहे,” असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 12:03 pm

Web Title: rahul gandhi calls aaditya thackeray bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 राज्यातील सत्ता टिकवणं तुमच्यासाठी संकट; प्रविण दरेकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2 २९ मे पासून सलून, ब्युटी पार्लर सुरु? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या “त्या’ अधिसूचना खोट्या
3 सलून चालवणाऱ्या महिलेला करोनाची लागण; वर्ध्यात खळबळ
Just Now!
X