मराठवाडय़ातील आठपैकी ५ लोकसभा मतदारसंघ शिवसेना-भाजपच्या ताब्यात आहेत. विधानसभेत मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद युतीपेक्षा अधिक आहे. काँग्रेसचे १८, तर राष्ट्रवादीचे १२ आमदार आहेत. विधानसभेत ताकदवान असणारा पक्ष लोकसभेत कमजोर असल्याचे चित्र ज्या मराठवाडय़ात आहे, तेथे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा उद्या (बुधवारी) दुपारी पावणेबारा वाजता आयोजित केली आहे.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शामियाना उभारला असून, सभेला ५० हजार लोक येतील असा दावा काँग्रेसचे नेते करीत आहेत. दरम्यान, कार्यकर्त्यांनी सभेला यावे, यासाठी १ हजार ७५ एसटी महामंडळाच्या बस औरंगाबाद व जालना जिल्हय़ांत पाठविण्यात येणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत लातूर व नांदेड या दोन लोकसभा मतदारसंघांत काँग्रेसला हमखास यश मिळत आले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, दिवंगत नेते विलासराव देशमुख व पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर नेतृत्व करीत असणाऱ्या मतदारसंघांतून निवडून आलेले भास्करराव खतगावकर पाटील व जयवंत आवळे ही दोन नावे वगळता मराठवाडय़ातून शिवसेना-भाजपचेच उमेदवार गेल्या वेळी निवडून आले. परभणी, जालना, हिंगोली, औरंगाबाद व बीड या पाच मतदारसंघांत युतीचे उमेदवार निवडून आले. औरंगाबाद व जालना मतदारसंघांत विजय मिळविणे अवघड होऊन बसल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून आहे. या पाश्र्वभूमीवर राहुल गांधी यांची सभा होत आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात सभेचे स्थळ असल्याने वाहतूक अन्य मार्गाने वळविली आहे. खडकेश्वरजवळील महापालिका वाचनालय ते भडकल गेट, भडकल गेटजवळील आयटीआयपर्यंतचा रस्ता, भडकल गेट ते जुन्या टपाल कार्यालयाच्या बाजूने जाणारा रस्ता, नारळीबाग येथील आमदार जैस्वाल कार्यालय ते जि.प. कर्मचारी निवासस्थानदरम्यान जाणारा रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. मंगळवारी सभेची जय्यत तयारी सुरू होती. दिवसभर शहरातील दुभाजकांवरील ग्रीलला काँग्रेसचे झेंडे लावले गेले. सभास्थळी मोठा शामियानाही उभारण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू झाल्याने त्या अनुषंगानेही शामियान्यात बदल केले गेले. सभेला अधिकाधिक संख्येने गर्दी व्हावी, यासाठी १ हजार ७५ बसची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी १ कोटी ९५ लाख रुपयांची अनामत रक्कमही काँग्रेसने एस. टी. महामंडळाकडे जमा केली. जालना जिल्हय़ात १७५, औरंगाबाद ३०, फुलंब्री ४५, पैठण ५०, सिल्लोड ३००, वैजापूर १३०, कन्नड १९०, गंगापूर ५०, सोयगाव येथे ६५ बस पाठविण्यात येणार आहेत. याशिवाय परभणीतूनही कार्यकर्ते येणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.