काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आता चहुबाजूंनी त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरु झाला आहे. प्रसिद्ध रंगकर्मी आणि सावरकरांचे खंदे समर्थक असलेल्या योगेश सोमण यांनी देखील या वादावर भाष्य केले आहे. “राहुल गांधी (खान) चा तीव्र निषेध” अशा शब्दांत त्यांनी आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

सोमण म्हणतात, “खऱंय राहुल भाऊ तू सावरकर नाहीस. कारण त्यांच्यातलं तुझ्यात काहीच नाही. ना त्याग, ना तेज, ना तर्क, ना तळमळ, ना तिखटपणा यातलं काहीही नाही. पण खरंतरं मला वाटतं तू गांधीही नाहीस. कारण त्यांच्यातलंही तुझ्यात काहीही नाही. कसंय लग्नानंतर भारतीयांना पटेल असं एखादं आडनाव असावं म्हणून तुझ्या इंदिरा आज्जीला आणि फरोज आब्बांना गांधीजींनी हे आडनाव दिलंय म्हणे. आधी तो इतिहास जाणून घे. सध्याची तुझी अवस्था म्हणजे आधीच मर्कट आणि त्यात मद्य पायलेला अशी आहे. पण तरीही तुझ्या आजच्या पप्पूगिरीचा मी जाहिर निषेध करतो. कारण सावरकर आडनाव घेण्याची सुद्धा तुझी लायकी नाही.”

‘रेप इन इंडिया’ या आपल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, या भाजपाच्या मागणीवर राहुल गांधी यांनी शनिवारी भाष्य केले. “माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे मी कदापी माफी मागणार नाही,” अशा वादग्रस्त शब्दांत त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. रामलीला मैदानावर काँग्रेसच्या ‘भारत बचाव रॅली’दरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर घणाघात केला.

या विधानानंतर भाजपाने राहुल गांधी यांच्यावर शरसंधान साधले असून “एक-दोन नाही १०० जन्म घेतले तरीही राहुल गांधी यांना वीर सावरकर होता येणार नाही.” अशा शब्दात भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधींवर टीका केली. तर दुसरीकडे सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनीही तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीररित्या राहुल गांधी यांना जोडे मारावेत” असं रणजीत सावरकर यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नखाचीही सर नाही. त्यांनी स्वतःला ‘गांधी’ समजण्याची घोडचूक अजिबात करू नये. केवळ गांधी आडनाव असल्याने कोणीही ‘गांधी’ होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.