राहुल गांधी यांचा धुळ्यातील जाहीर सभेत आरोप

धुळे : आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी मोठय़ा उद्योगपतींना देण्याचा डाव हाणून पाडण्यात येईल. या जमिनींवर आदिवासी शेतकऱ्यांचाच हक्क असून तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. हे शेतकरी, बेरोजगार तरूणांचे नव्हे, तर अंबानी, मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्यासारख्यांचे सरकार आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील प्रचाराची सुरूवात शुक्रवारी येथील एस.एस.व्ही.पी.एस.महाविद्यालयाच्या मैदानावरील जाहीर सभेने केली. प्रारंभी पुलवामा हल्ल्यातील शहिदांना गांधी यांनी श्रध्दांजली अर्पण केली. पुलवामा हल्ल्यानंतर सत्ताऱ्यांवर काँग्रेसचा नेता आरोप करणार नाही असे आपण सांगितले होते. देश कोणत्या स्थितीतून जात आहे, याचे काँग्रेसला भान आहे, पण दुसरीकडे पंतप्रधान मात्र विरोधकांवर टीका करीत आहेत, हे दुर्देव असल्याचे गांधी यांनी सांगितले.मोदी आदिवासी शेतकऱ्यांची जमीन मोठय़ा उद्योगांना देण्याचे स्वप्न पाहत आहेत, परंतु तसे आम्ही करू देणार नाही. आदिवासी शेतकऱ्यांची जमीन घ्यायचीच असेल तर प्रचलित दराच्या चौपट दर मोजण्याची तयारी ठेवावी लागेल. महाराष्ट्रातील शेतकरी विम्याचे पैसे आपल्या खिशातून भरत आहेत. दुसरीकडे उद्योगपतींचा विविध पद्धतीने फायदा करून दिला जात आहे. शेतकऱ्यांची जमीन आणि भविष्य हिसकावून उद्योगपतींचा फायदा करून दिला जात असल्याची टीका गांधी यांनी केली.

यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री नसीम खान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार अमरीश पटेल, आदी उपस्थित होते.

आजवर झालेल्या बहुतांश लोकसभा निवडणुकीनिमित्त काँग्रेसने धुळे जिल्ह्य़ातूनच प्रचारास सुरूवात केली आहे. धुळे जिल्हा विभाजनापूर्वी नंदुरबार हा धुळ्याचाच भाग होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ फेब्रुवारीला याच मैदानावर सभा घेऊन धुळे जिल्ह्य़ाला महत्त्व दिले. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने राहुल गांधी यांची सभा घेऊन भाजपला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला

सत्ताधारी आता आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मागे लागले आहेत. ज्याची जमीन त्यांना द्यावीच लागणार आहे, हे सरकार विसरले आहे. पंतप्रधान आश्वासनाला जागले असे उदाहरण आपण आजही शोधत आहोत. भाजप समाजा-समाजात फूट पाडण्याचे काम करीत आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास वर्षभरात गरिबांना, शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल. युवकांना रोजगार उपलब्ध करण्यात येईल. 

– राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष