16 January 2019

News Flash

मनरेगाचा वर्षभराचा निधी नीरव मोदीच्या घशात

राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल, दादाजी खोब्रागडे कुटुंबीयांचे सांत्वन

दादाजी खोब्रागडे यांचा मुलगा मित्रजीत, सून इंदिरा आणि इतर कुटुंबीयांबरोबर राहुल गांधी.

|| राजेश्वर ठाकरे/रवींद्र जुनारकर

राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल, दादाजी खोब्रागडे कुटुंबीयांचे सांत्वन

मोदी सरकारच्याच कृपेने हिरे व्यापारी निरव मोदी  बँकांचे ३५ हजार कोटी रुपये घेऊन परदेशात पळाला. इतक्या पैशात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची वर्षभर पुरतील इतकी कामे करून लाखो मजुरांना रोजगार देता आला असता. दादाजी खोब्रागडे यांना यातले पाच कोटी रुपये दिले असते तर त्यांनी पाच हजार युवकांना रोजगार दिले असते, परंतु मोदी सरकारला शेतकऱ्यांपेक्षा गर्भश्रीमंत उद्योगपतींची काळजी जास्त आहे, असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला.

गेल्या चार वर्षांत मोदी सरकारने देशातील १५ श्रीमंत उद्योगपतींचे अडीच लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही. या उदार सरकारच्या दरबारात उद्योगपतींचे कर्ज माफ केले जाऊ शकते, तर शेतकऱ्यांचे का नाही, असा खडा सवालही त्यांनी केला.

धानाचे एचएमटी वाण आणि इतर नऊ वाण विकसित करणारे चंद्रपूर जिल्ह्य़ातील नांदेड येथील कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांचे ३ जूनला निधन झाले. राहुल गांधी यांनी आज बुधवारी नांदेड येथे जाऊन दादाजींच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी ‘चावडी संवाद’ साधला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक गेहलोत, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले, विधान सभेतील उपनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते.

प्रदेश काँग्रेसकडून अडीच लाखांची मदत

राहुल गांधी यांनी दादाजींच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी प्रदेश काँग्रेसकडून दिवंगत दादाजी खोब्रागडे यांचा मुलगा मित्रजीत आणि सून इंदिरा यांना अडीच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. याशिवाय विधान सभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाच लाख रुपये देण्याचे जाहीर केले. तसेच माजी खासदार नरेश पुगलिया यांनी एक लाख रुपयांचा धनादेश दिला आणि खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांतील एकाला नोकरी देण्याचे जाहीर केले.

पंतप्रधान खोटारडे, देशाचा विश्वास उडाला

पंतप्रधानाचे काम देशाला दिशा देण्याचे असते, परंतु मोदी लोकांमध्ये आपसात भांडणे  लावण्याचे काम करत आहेत. कधी योग तरी कधी स्वच्छता अभियानावर बोलतात. बेरोजगारी, भ्रष्टाचारावर बोलत नाहीत. म्हणून मोदी देशाला आश्वासक वाटत नाहीत. ते एकामागून एक खोटे बोलत सुटले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देशातील लोकांचा विश्वास उडाला आहे, अशा तीव्र शब्दात राहुल यांनी मोदींवर हल्ला चढवला.

First Published on June 14, 2018 12:59 am

Web Title: rahul gandhi nirav modi mgnrega scheme