शिर्डीतील साईबाबांच्या चमत्काराचा हवाला देत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर टीका करणे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना महागात पडले आहे. साईबाबा संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी याप्रकरणी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये शिर्डीला ओढणे अत्यंत दुर्दैवी आहे. यामुळे साईबाबांच्या भक्तांच्या भावनेला ठेच पोहोचली असून तुम्ही साईभक्तांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

सुरेश हावरे यांनी ट्विट केले आहे. ते म्हणतात, राहुलजी राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये शिर्डीला खेचणे खूप दुर्दैवी आहे. यामुळे देश-विदेशातील साईभक्तांच्या भावनेला ठेच पोहोचली आहे. सर्व भक्तांच्या वतीने मी तुमचा निषेध करतो. या अपमानासाठी तुम्ही साई भक्तांची माफी मागितली पाहिजे.

राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधताना म्हटले होते की, मित्रों, शिर्डीतील चमत्कारांना कोणतीही मर्यादा नाही, असे म्हणत त्यांनी #PiyushGhotalaReturns असे लिहिले होते. त्यांच्या या ट्विटनंतरच वाद सुरू झाला होता.

काय आहे प्रकरण..

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यावर आरोप केले होते. पीयूष गोयल २५ एप्रिल २००८ ते १ जुलै २०१० दरम्यान शिर्डी इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि पूर्णवेळ संचालक होते. याच कालावधीत कंपनीने यूनियन बँकेच्या अधिपत्याखाली असलेल्या बँकेकडून २५८.६२ कोटींचे कर्ज घेतले होते. गोयल यांनी नंतर कंपनीचा राजीनामा दिला होता. मोदी सरकार केंद्रात आल्यानंतर ६५१.८७ कोटी रूपये थकीत कर्जापैकी ६५ टक्के कर्ज माफ केले होते.