‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’च्या विद्यार्थ्यांवर सरकारने दबाव आणणे चुकीचे असून त्यांच्याशी चर्चा केल्यामुळे सरकार लहान होणार नाही, तर सरकारचीच उंची वाढेल,’ असे म्हणत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंब्याचा ‘हात’ दिला. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा मुद्दा संसदेत मांडू, असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या आमंत्रणावरुन राहुल यांनी शुक्रवारी संस्थेस भेट देऊन चर्चा केली, तसेच त्यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेले लघुचित्रपट देखील पाहिले. ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर, दाक्षिणात्य चित्रसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी, अभिनेत्री खुशबू, रम्या आदि या वेळी उपस्थित होते. राहुल म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी मला संस्थेस भेट देण्यास बोलवले. सरकारने त्यांचा आवाज ऐकावा व चर्चा घडावी इतकेच या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

‘संघाचे धोरण’
शिक्षण क्षेत्र, नोकरशाही आणि न्यायालयीन यंत्रणेचा दर्जा घटवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवर संघाचे धोरण असून अभिनेते गजेंद्र चौहान यांची एफटीआयआय सोसायटीच्या अध्यक्षपदी झालेली नियुक्ती हा त्याच धोरणाचा एक भाग आहे, असे राहुल यांनी सांगितले.