अवैध कोळसा खाण वाटपप्रकरणी टॉपवर्थ कंपनीशी संबंधित नागपूर शहरातील चार ठिकाणी तसेच यवतमाळ व मुंबईसह देशातील विविध ठिकाणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय)पथकांनी छापे मारून झडती घेतली. केंद्रीय कोळसा मंत्रालयातर्फे १९९३ ते २००५ दरम्यान मुंबई येथील वीरांगना स्टिल कंपनी व नागपुरातील टॉपवर्थ पॉवर अँड स्टिल कंपनीला मार्की मांगली २, ३ व ४ कोळसा ब्लॉक देण्यात आले होते. सीबीआयच्या दिल्लीहून आलेल्या पथकांनी नागपुरातील चार ठिकाणी छापे मारले. किंग्ज वेवरील श्रीराम टॉवर इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या टॉपवर्थ कंपनीचे कार्यालय, वर्मा लेआऊटमधील एका सी.ए.चे निवासस्थान, सिव्हिल लाईन्समध्ये तसेच वीरांगना स्टिल कंपनीच्या कार्यालयावर शुक्रवारी छापा मारण्यात आला. यवतमाळ व मुंबईतही छापे मारण्यात आले. या सर्व ठिकाणी सीबीआयच्या कर्मचाऱ्यांनी कसून चौकशी करून कागदपत्रे जप्त केली. या दोन्ही कंपन्यांचे संचालक व इतरांविरुद्ध सीबीआयने गुन्हे दाखल केले.