शहरातील बांधकाम उद्योजक व व्यापा-यांच्या निवासस्थानी शुक्रवारी प्राप्तिकर विभागाच्या पथकाने छापे टाकले. नगरसेवक जयंत पाटील यांच्यासह सात व्यापा-यांचा यामध्ये समावेश असल्याचे सांगण्यात येते. अधिका-यांकडून संशयास्पद व्यवहाराची चौकशी दीर्घकाळ सुरू होती.
दर दोन-तीन वर्षांनी अशा प्रकारची चौकशी होतच असते. त्यामध्ये आक्षेपार्ह असे काही नसल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. शहरातील व्यापारी वर्तुळात या प्रकारामुळे खळबळ उडाली. या धाडीमागे राजकीय संदर्भ आहे का, याचीही चर्चा रंगलेली होती.
शहरातील बांधकाम क्षेत्रातील आíथक व्यवहाराबाबत शंका व्यक्त केली जात होती. बिल्डर व अन्य बांधकाम व्यावसायिकांकडे काळा पसा मोठय़ा प्रमाणात गुंतला असल्याचेही सांगण्यात येते. या पाश्र्वभूमीवर आजच्या प्राप्तिकर विभागाच्या धाडींना महत्त्व प्राप्त झाले आहे. प्राप्तिकर विभागाचे अधिकारी व कर्मचा-यांचे पथक शुक्रवारी सकाळी लवकर बांधकाम व्यावसायिकांच्या निवासस्थानी पोहचले त्यांनी आíथक व्यवहाराची कागदपत्रे मागवून त्या आधारे चौकशी सुरू केली. कागदपत्रांची छाननी करण्याचे काम बराच वेळ सुरू होते.
शहरातील सात व्यापा-यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाची धाड पडल्याचे वृत्त समजताच या क्षेत्रातील अन्य व्यावसायिक व व्यापारी वर्गात खळबळ उडाली. कोणत्या व्यावसायिकांकडे धाडी पडलेल्याची माहिती घेतली जात होती. तर नगरसेवक जयंत पाटील यांच्या निवासस्थानी पडलेल्या धाडीमुळे राजकीय लागेबांदे आहेत का, यावरूनही उलट सुलट चर्चा होत होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी पाटील हे सतेज पाटील यांचे समर्थक होते पण निवडणुकीवेळी त्यांनी आमदार अमल महाडिक यांची पाठराखण केली होती. राजकीय वादातून धाड पडली गेली का, याची चर्चा होती. याबाबत नगरसेवक जयंत पाटील म्हणाले, दर दोन-तीन वर्षांनी प्राप्तीकर विभागाकडून आíथक व्यवहाराची सखोल चौकशी होत असते. आताची चौकशीही त्याचाच भाग असून त्यामध्ये काहीही आक्षेपार्ह नाही.