लोणावळा परिसरात तुंगार्ली जवळील गोल्ड व्हॅली येथील एका बंगल्याच्या आवारात मद्यप्राशन करून अश्लील व बीभत्स नृत्य करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या रेव्ह पार्टीवर बुधवारी मध्यरात्री लोणावळा पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणाहून वीस तरुणींसह ४७ तरूण-तरूणींना अटक केली. त्यात बंगल्याचा मालक आणि व्यवस्थापकाचा समावेश आहे. पकडण्यात आलेले तरुण मुंबई येथील एका नामांकित विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी असून, या ठिकाणाहून विदेशी दारू आणि हुक्क्य़ाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील तुंगार्ली प्रभागातील गोल्ड व्हॅली येथील सफुद्दीन कोलंबोवाला, प्लॉट नं. ५० या बंगल्यात काही तरूण तरूणी डिजेच्या मोठ्या आवाजात आरडाओरडा करून नाचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक़ आय. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री साडेबाराच्या सुमारास पोलिसांनी बंगल्यावर छापा टाकला. या वेळी पोलिसांना काही तरूण- तरूणी अर्धनग्न व मद्यधुंद अवस्थेत बीभत्स नृत्य करताना व अश्लील चाळे करताना आढळून आले. पोलिसांनी याठिकाणी मोठ्याप्रमाणात देशी-विदेशी बनावटीची महागडी दारू, हुक्कापॉट आणि विविध सुगंधी तंबाखूचे फ्लेव्हर्स, म्युझिक साहित्यासह या सर्वाना पकडले. त्यानंतर त्यांना अटक करून रात्रीच त्यांची वैद्यकीय तपासणी केली. घटनास्थळावर देशी व विदेशी दारूच्या बाटल्या, हुक्क्याचे साहित्य असा सुमारे १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.  तरुण आणि तरुणींसह बंगल्याचा मालक सफुद्दीन एके कोलंबोवाला व व्यवस्थापक दिलीप राममीलन यादव यांनाही अटक करण्यात आली आहे. सर्व तरूण-तरूणी उच्चभ्रू कुटूंबातील असून, ते मुंबईतील एका नामांकित विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. या सर्वाना दुपारी वडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वाची दहा हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली. याप्रकरणाचा पुढील तपास लोणावळा शहर पोलिस निरीक्षक आय. एस. पाटील करत आहेत.
लोणावळ्यात अनेक निवासी बंगल्यांचा वापर अशाप्रकारच्या रेव्ह पाट्र्यासाठी सातत्याने होत असून, यापूर्वीही लोणावळा शहर आणि  परिसरात शहर व ग्रामीण पोलिसांनी छापे टाकले आहेत. यात चार वर्षांपूर्वी बारबालांसह अनेक कस्टम अधिकारी, तसेच पवनाधरण परिसरातही ३१ जुल २०१३ ला एका बंगल्यात १४ बारबालांसह अनेक धनिक तरूणांना पोलिसांनी अटक केली होती. लोणावळयात अनेक मोठ मोठे आलिशान बंगले, फार्म हाऊस असून, अशा निवासी क्षेत्राचे संबंधित मालक व्यावसायिक वापर करत असल्याचे प्रकार अनेकवेळा उघडकीस आले असून, पालिका प्रशासन याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करत आहे.