रायगडकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. गेल्या चोवीस तासात तब्बल १२८ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ५६ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा २,२९६ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात उपचारांदरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात १२८ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील ७३, पनवेल ग्रामीणमधील १६, उरणमधील ५, कर्जत ७, पेण २, अलिबाग १२, महाड ५, पोलादपूर ८ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीतील २ एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ५६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील ६,३८२ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ४,०६७ जणांचे अहवाल नकारात्मक आले. २,२९६ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर १९ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. १,५५१ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या ६४९ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ३६३, पनवेल ग्रामीण हद्दीतील १०९, उरणमधील ३०, खालापूर ४, कर्जत २२, पेण ३२, अलिबाग ३८, मुरुड ४, माणगाव ११, रोहा १, म्हसळा ११, महाड १६, पोलादपूरमधील ८ करोना बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत ९६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले ५८ हजार ५२४ जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. करोना रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. सुरुवातीला पनवेल आणि उरण तालुक्यांपुरता मार्यादित असलेला करोना आता जिल्ह्यातील इतर भागातही वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे.