राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया मार्मिक

कन्या जिल्हा परिषद अध्यक्ष, मुलगा व पुतण्या आमदार, आगामी लोकसभा निवडणुकीत घरातीलच कोणीतरी लढणार हे निश्चित. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तटकरे यांच्या घराण्यातील कोणाला उमेदवारी देता येईल का, याचा मी सध्या शोध घेत आहे ही राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी तटकरे यांच्याबाबत व्यक्त केलेली प्रतिक्रिया मार्मिक आहे. रायगड म्हणजे तटकरे यांची घराणेशाही हे जणू समीकरणच तयार झाले आहे.

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागली आहे. त्यासाठी मी तटकरेंच्या कुटुंबातील कोणाला उमेदवारी देता येईल का, याच्या शोधात आहे अशी टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी नुकतीच केली आहे. हे कोकणातील राष्ट्रवादीच्या राजकारणात तटकरे कुटुंबाच्या घराणेशाही आणि एकाधिकाराचे द्योतक आहे. सर्व पदे घरातच ठेवण्याचा तटकरे यांचा अट्टाहास पक्षांतर्गत नाराजीला कारणीभूत ठरू लागला आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघातून राजीव साबळे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, पण त्यांना डावलून अवधूत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे राजीव साबळे पक्ष सोडून गेले. जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्षपद महिला प्रवर्गासाठी राखीव होते. पक्षातील ज्येष्ठ महिला कार्यकर्त्यांना डावलत मुलगी आदितीचे नाव पुढे आणले गेले. रोहा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी समीर शेडगे आणि संदीप तटकरे इच्छुक होते. मात्र, दोघांनाही डावलत तटकरे यांनी स्वत:चे व्याही संतोष पोटफोडे यांना उमेदवारी दिली. यानंतर तटकरे कुटुंबातील वाद उफाळून आला. अटीतटीच्या लढतीत जेमतेम सहा मतांनी पोटफोडे विजयी झाले.

विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्ताजीराव मसुरकर इच्छुक होते. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सुचनेनुसार त्यांनी उमेदवारी अर्ज आणून निवडणूक तयारी सुरू केली होती. मात्र अखेरच्या क्षणी सुनील तटकरे यांनी मुलगा अनिकेत याचे नाव पुढे केले आणि दत्ताजी मसुरकर यांना उमेदवारी नाकारण्यात आली.

जिल्ह्यात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी आता सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. पुन्हा एकदा सुनील तटकरे यांना रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तटकरे राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्तीवरून तसे संकेत मिळाले आहेत. मात्र तटकरे स्वत: ही निवडणूक लढवण्यास कितपत इच्छुक आहेत याबाबत साशंकता आहे. गेल्या चार वर्षांत त्यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे कधीही जाहीर केलेले नाही.

पक्षांतर्गत एकाधिकारशाही आणि घराणेशाहीमुळे महेंद्र दळवी, राजीव साबळे, शाम भोकरे, सुरेश टोकरे, समीर शेडगे, महेश मोहिते यांच्यासारखे दुसऱ्या फळीतील भक्कम नेते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून केले. पक्ष सोडणाऱ्या प्रत्येक नेत्याने तटकरे यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले. याची मोठी किंमत पक्षाला स्थानिक पातळ्यावरील निवडणुकांमध्ये चुकवावी लागली. मुरुड आणि माथेरानसारख्या नगरपालिका गमवाव्या लागल्या.

जिल्हा परिषद सदस्यांची संख्या २२ वरून १२ वर आली. जिल्ह्यत पहिल्या क्रमांकाचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. नगरसेवकांची संख्या ६३ वरून ३९ वर आली. विधानसभा निवडणुकीत सातपैकी पाच मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कार्यकर्त्यांमध्ये असणारी पक्षांतर्गत एकाधिकारशाही आणि घराणेशाहीची हीच सल भास्कर जाधव यांनी प्रथमच जाहीर बोलून दाखवली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांचा आठ हजार मतांनी पराभव झाला. सुनील तटकरे हे नामसाधम्र्य असलेल्या अपक्ष उमेदवाराला तब्बल नऊ हजार मते मिळाली होती. तटकरे हे घरातच उमेदवारी ठेवतील अशी शक्यता आहे.

आदिती तटकरे लोकसभेच्या उमेदवार?

तटकरे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपतो आहे, पुन्हा एकदा विधानपरिषदेवर जाण्याची त्यांची तयारी असणार आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या आदिती तटकरे हिला लोकसभा निवडणुकीत उतरवले जाऊ  शकते. तसे झाल्यास आगामी विधानसभा निवडणूक स्वत: सुनील तटकरे हे लढवू शकतात. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाबाबत दिलेली प्रतिक्रिया मार्मिक आहे. तटकरे यांनी राजकारणात सर्वाना समान संधी न देता नेहमीच कुटुंबीयांनाच प्राधान्य दिले आहे.