गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या युती आघाडीच्या चच्रेला अखेर पूर्णविराम मिळाला. शेकाप, शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पाचही पक्ष आता स्वबळावर लढणार असल्याने रायगड जिल्ह्य़ातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. या मतविभाजनाचा फायदा नेमका कोणाला होणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जिल्ह्य़ात सातही जागांवर स्वबळावर निवडून येण्याची ताकद कुठल्याही राजकीय पक्षात नाही. प्रत्येक पक्षाची स्वत:ची शक्तीकेंद्र ठरलेली आहेत. पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या चारही मतदारसंघांत शेतकरी कामगार पक्ष प्रभावी आहे. तर महाडमध्ये काँग्रेसच्या तुलनेत शिवसेनेची ताकद अधिक आहे. श्रीवर्धन आणि कर्जतमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना तुल्यबळ आहेत. अशा परिस्थितीत निवडून येण्यासाठी सर्वच पक्षांना आपल्या मित्रपक्षांची गरज भासणार आहे. विशेषत: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ती अधिक भासणार आहे.
आघाडी तुटण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसला आधीच मिळाले होते. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांची इच्छा नसतानाही तटकरे यांनी शेकापशी जुळवून घेतले. यात कर्जत आणि श्रीवर्धनची जागा वाचवण्याचा प्रयत्न तर आहेच. शिवाय विधानसभा निवडणुकीत जिल्हा स्तरावर शेकापशी युती होऊ शकते. हे नजरेसमोर ठेवूनच तटकरे यांनी शेकापला कुरवाळण्याचा प्रयत्न केला. त्यात मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसची चांगलीच गोची झाली.
मुख्यमंत्र्यांवर शरसंधान करत भाजपवासी झालेले पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे मात्र युती तुटल्यामुळे चांगलेच अडचणीत आले आहे. ठाकूर यांच्या प्रवेशाने पनवेलमध्ये भाजपची ताकद वाढली असली तरी शिवसेनेच्या उमेदवारीचा थेट फटका त्यांना बसू शकतो. शेकाप-राष्ट्रवादी युतीच्या शक्यतेने कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड यांचे होसले बुलंद झाले आहेत. त्यातच शिवसेनेतील उमेदवारीची साठमारी त्यांच्या पथ्यावर पडू शकणार आहे. पेणमध्ये शेकापचे विद्यमान आमदार धर्यशील पाटील यांचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र राष्ट्रवादीने या मतदारसंघावर दावा सांगितल्यास ते अडचणीचे ठरू शकते.     श्रीवर्धन मतदारसंघात सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे हे निवडणूक लढवणार आहेत. या वेळी स्वत: सुनील तटकरे उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीला फटका बसू शकतो. मात्र काँग्रेसचा उमेदवार कोण असेल यावर पुढील गणिते अवलंबून असतील. महाड मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद फार नसली तरी त्यांच्या उमेदवारीचा थेट फटका काँग्रेसच्या माणिक जगताप यांना बसू शकेल. अलिबाग आणि उरण मतदारसंघांत मात्र शेकापच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
एकूणच युती आघाडी फिसकटल्याने त्याचा सर्वाधिक फायदा जिल्ह्य़ात शेतकरी कामगार पक्षाला मिळण्याची शक्यता आहे.