मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेची गंभीर दखल घेऊन श्रीबाग मध्यवर्ती ग्राहक मंडळ आणि अलिबाग खरेदी विक्री संघाने पुन्हा एकदा रायगड बाजारचे नव्याने केलेले बांधकाम हटवण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरणविषयक नियम धाब्यावर बसवून हे सीआरझेड क्षेत्रात या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. या प्रकरणी भाजपा नेते महेश मोहिते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेच्या सुनावणी पूर्ण होईल तोवर नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचा वापर करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून ही सुसज्ज इमारत वापराविना पडून होती. वास्तविक पाहता सीआरझेड क्षेत्रात इमारत बांधण्यापूर्वी पर्यावरण विभागाची परवानगी घेणे अपेक्षित होते. मात्र संस्थाचालकांनी ही परवानगी न घेताच सीआरझेड क्षेत्रात नवीन इमारतीची उभारणी केली.  विशेष म्हणजे सदर इमारतीचे बांधकाम बेकायदेशीरपणे सुरू असल्याची तक्रार भाजपाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र जिल्हाधिकारी यांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची सुनावणी प्रलंबित असतानाच आता नव्याने बांधण्यात आलेल्या रायगड बाजारच्या देखण्या इमारतीचे बांधकाम पुन्हा एकदा हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून इमारतीतील सामान हलवण्यात आले असून आता दर्शनी भागातील काचाही उतरवण्यात आल्या आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वी अस्तित्वात असलेल्या रायगड बाजारच्या जुन्या इमारतीलाही न्यायालयाने अनधिकृत ठरवले होते आणि सदर इमारत पाडून टाकण्याचे आदेश दिले होते. यानंतर श्रीबाग मध्यवर्ती ग्राहक मंडळ आणि अलिबाग खरेदी-विक्री संघाने ही इमारत स्वखर्चाने जमीनदोस्त केली होती. यानंतर नगरपालिकेच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या श्रीबाग मध्यवर्ती ग्राहक मंडळाला पुन्हा एकदा ठराव करून ही जागा भाडेकरारावर देण्यात आली. या जागेवर जवळपास दीड ते दोन कोटी खर्च करून सुसज्ज इमारत उभारण्यात आली. मात्र न्यायालयाने या इमारतीच्या वापरावर र्निबध आणले. यानंतर रायगड बाजारची नव्याने बांधण्यात आलेली इमारत पुन्हा हटवण्याचा निर्णय संस्थाचालकांनी घेतला असल्याचे बोलले जात आहे.