कोल्हापूर: राज्य शासनाच्या माध्यमातून स्थापन झालेल्या रायगड प्राधिकरण विकास महामंडळाच्या वतीने रायगडावर विविध विकास कामांसाठी सर्व प्रकारची परवानगी एकाच छताखाली मिळण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे. गेल्या तीन वर्षात केवळ पाच टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामे आगामी आठ वर्षात पूर्ण होतील, अशी माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये अद्ययावत ध्वनी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याचे संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीनं झालेल्या कामाचा आढावा घेताना ते म्म्हणले, रायगडचे संवर्धन सुरू आहे त्याचप्रमाणे कोल्हापुरातील अन्य ऐतिहासिक वास्तू जतन होण्याचा आपला उद्देश आहे. पुरातत्व विभागाकडून काही परवानग्या मिळायला उशीर होत असल्याने सर्व परवानग्या एकाच छताखाली मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरूआहे. रायगड विकासाच्या कामात भाजप सरकार प्रमाणेच महाविकास आघाडी सरकारचे चांगले सहकार्य मिळत आहे.

महालक्ष्मी मंदिरात भक्तीगीतांचे सूर उमटणार

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात आजपासून अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याने पहाटेच्या वेळी मंगलमय भक्ती आणि भावगीतांचे सूर उमटणार आहेत. परिसरातील वातावरण अधिकच चैतन्यमय होण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने या ध्वनी यंत्रणेसाठी दीड कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.