राज्य शासनाच्या ग्रामीण विकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या यशवंत पंचायतराज अभियानात रायगड जिल्हा परिषद कोकण विभागात अव्वल ठरली आहे. पंचायत समिती गटात सुधागड पाली, ग्रामपंचायत विभागात अलिबाग तालुक्यातील आंबेपूर, रोहा तालुक्यातील धाटाव ग्रामपंचायतीला गौरवण्यात आले आहे. राज्यपाल विद्यासागर राव आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत नुकतेच मुंबईत या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यशवंत पंचायत राज अभियान २०१५-१६ अंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींनी २०१४-१५ या आíथक वर्षांत केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यात आले. यात जिल्हा परिषदेचे कामकाज, कर्मचारी व्यवस्थापन व क्षमता, नियोजन आणि अंदाजपत्रक, उत्पन्नाची साधने, योजनांची कामगिरी, लेखे जबाबदारी व पारदर्शकता तसेच नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेण्यात आली. या मूल्यांकनात कोकण विभागात रायगड जिल्हा परिषद अव्वल ठरली. ग्रामपंचायत विभागात अलिबाग तालुक्यातील आंबेपूर ग्रामपंचायतीने प्रथम, रोहा तालुक्यातील धाटाव ग्रामपंचायतीने द्वितीय, पालघर तालुक्यातील पास्थळ ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला. तर विभागीय पातळीवर सुधागड पाली पंचायत समितीने द्वितीय क्रमांक पटकावला, मालवण पंचायत समितीला प्रथम क्रमांक तर कणकवली पंचायत समितीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, उपाध्यक्ष अरिवद म्हात्रे, अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी माजी आमदार मीनाक्षी पाटील, आमदार सुभाष पाटील उपस्थित होते.