संपत्तीची कोटींची उड्डाणे; तटकरेंची २८ वर्षीय कन्या ४८ लाखांची धनी!

रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी कोटय़वधी रुपयांची संपत्ती असणारे अनेक उमेदवार निवडणूक िरगणात उतरवले आहेत.

  •  चित्रा पाटील- जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती असणाऱ्या शेकापच्या चित्रा पाटील थळ आणि कुर्डूस मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वत:कडे १ कोटी ८२ लाख, तर त्यांच्या पती आस्वाद पाटील यांच्याकडे १ कोटी ३७ लाख रुपयांची जंगम मालमत्ता दाखवली आहे. तर स्वत:च्या नावावर ७ कोटी २९ लाख, तर पतीच्या नावावर ४ कोटी २९ लाख रुपयांची मालमत्ता दाखवली आहे.
  •  मानसी दळवी- शिवसेनेकडून थळ मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या मानसी दळवी यांनी  स्वत:कडे १ कोटी ५२ लाख रुपयांची, तर पती महेंद्र दळवी यांच्याकडे १ कोटी १२ लाख रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. तर स्वत:च्या नावावर २२ कोटी ४० लाख रुपयांची, तर पतीच्या नावावर ३८ कोटी ८२ लाख रुपयांची मालमत्ता दाखवली आहे.
  •  राजेंद्र ठाकूर- मापगाव मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र ठाकूरही कोटय़धीश आहेत. त्यांनी स्वत:कडे २६ कोटी ७७ लाख रुपयांची, तर पत्नीकडे १ कोटी ८१ लाख रुपयांची जंगम मालमत्ता दाखवली आहे. तर स्वत:च्या नावावर ३० कोटी ६८ लाख बाजारमूल्याची, तर पत्नीच्या नावावर १ कोटी ८२ रुपयांची स्थावर मालमत्ता दाखवली आहे.
  • आदिती तटकरे – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे वरसे मतदारसंघातून निवडूक लढवत आहेत. २८ वर्षांच्या आदिती तटकरे यांच्याकडे ४८ लाख ५१ हजार रुपायांची जंगम मालमत्ता असून १४ लाख रुपयांची देणी असल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
  •  नंदकुमार मयेकर – शेकापकडून चौल मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या नंदकुमार मयेकर यांच्या नावाकडे ५० लाख रुपयांची, तर पत्नीकडे ३१ लाख ५३ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर स्वत:च्या नावावर ४ कोटी ६७ लाख रुपयांची, तर पत्नीच्या नावावर ९२ रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
  •  किशोर जैन- नागोठणे मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार किशोर जैन हेदेखील कोटय़धीश आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वत:कडे १ कोटी ८० लाख, तर पत्नीकडे ६५ लाख रुपयांची जंगम मालमत्ता दाखवली आहे. तर स्वत:च्या नावावर १६ कोटी ९६ लाख, तर पत्नीच्या नावावर ३ कोटी ६९ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता दाखवली आहे.
  •  मधुकर पाटील – खारगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार मधुकर पाटील यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वत:कडे ६८ लाख ७३ हजार रुपयांची, तर पत्नीकडे २७ लाखांची जंगम मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. तर स्वत:च्या नावावर ६७ लाख ६५ हजार रुपयांची, तर पत्नीच्या नावावर १ कोटी ४४ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे.
  •  सुश्रुता पाटील- शहापूर मतदारसंघातील शेकापच्या उमेदवार आणि आमदार सुभाष पाटील यांच्या पत्नी सुश्रुता पाटील यांच्या नावार कोटय़वधीची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ५० लाखांची, तर पती सुभाष पाटील यांच्याकडे ३७ लाख ४१ हजार रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. तर स्वत:च्या नावावर सात कोटींची, तर पतीच्या नावावर ८ कोटी ३३ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता दर्शवली आहे.
  • वैकुंठ पाटील – काँग्रेसचे माजी मंत्री रविशेठ पाटील यांचे पुत्र आणि दादर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार वैकुंठ पाटील यांनी स्वत:कडे ४४ लाख, ३२ हजार रुपयांची जंगम मालमत्ता, तर ३२ कोटींची स्थावर मालमत्ता दाखवली आहे. ६० लाख रुपयांची देणी असल्याचेही त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
  • संजय जांभळे- वडखळ मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय जांभळे यांच्याकडे २ कोटी ३५ लाख रुपयांची, तर पत्नीकडे ७ लाख ५५ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर स्वत:च्या नावावर २ कोटी ३२ लाख, तर पत्नीच्या नावावर एक कोटींची स्थावर मालमत्ता दर्शवली आहे. २ कोटी ६० लाख रुपयांची देणी असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.