शनिवारी रायगड जिल्ह्यात अनेक अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे आंबा आणि काजू पिकाचे मोठ नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.

जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, सुधागड, माणगाव तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. तर महाड पोलादपुर परिसरातही पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. म्हसळा परिसरात पावसासोबत गारपीटही झाली. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरीकांना या पावसाने दिलासा मिळाला आहे. मात्र, पावसामुळे आंबा आणि काजू पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी आंबा पिकाला करोनाचा फटका
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकणातील आंबा बागायतदार धास्तावले आहेत. कोकणात आंबा हंगामाची सुरवात झाली आहे. आंबा विक्रीसाठी तयार आहे. पण खरेदीसाठी व्यापारी आणि ग्राहकच मिळत नसल्याचे बागायदारांची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे शासनाने आंब्याच्या वितरण आणि विक्रीसाठी व्यवस्था करावी अशी मागणी बागायतदारांकडून करण्यात आली होती.

रायगड जिल्ह्यात आंबा लागवडीखालील एकूण ४२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी १६ हजार ५०० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यातून दरवर्षी जवळपास २१ हजार ४२४ मेट्रीक टन इतके येवढे उत्पादन अपेक्षित असते. फेब्रुवारी महिन्यापासून हा आंबा बाजारात दाखल होण्यास सुरूवात होते. यंदा मात्र मार्च महिन्याच्या उत्तरार्धात दाखल होण्यास सुरवात झाली होती. मात्र करोनाचा प्रादुर्भाव, त्यानंतर संचारबंदी त्यामुळे आंबा बागायतदारांची मोठी कोंडी झाली आहे.