पश्चिम महाराष्ट्रातील कोरडय़ा आणि उष्ण हवामानात घेतले जाणारे भुईमुगाचे पीक कोकणातही घेतले जाऊ शकते, हे रायगड जिल्ह्य़ातील महाड-पोलादपूर परिसरांतील शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. खरिपाच्या भातशेतीपाठोपाठ भुईमुगाचे पीक घेऊन या शेतकऱ्यांनी आपली तोटय़ातील शेती फायद्यात आणली आहे.     कोकणातील भातशेती हा आता आतबट्टय़ाचा व्यवहार ठरू लागला आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि जमिनीचा पोत कमी झाल्याने भातातून मिळणाऱ्या उत्पन्नात सातत्याने घट होते आहे. त्यामुळे पारंपरिक भातशेतीबरोबरच नगदी पीक घेणे क्रमप्राप्त झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन महाड-पोलादपूर परिसरांतील शेतकऱ्यांनी भुईमुगाची लागवड केली आहे.
 पोलादपूर तालुक्यातील वाकण भगतवाडी येथील काशीबाई रामचंद्र सालेकर यापूर्वी आपल्या शेतात भाताचे पीक घेत होत्या, मात्र अनियमित पावसामुळे त्यांच्या वार्षिक उत्पन्नात सातत्याने घट होत होती. या परिस्थितीवर मात कशी करावी, हा प्रश्न त्यांना पडला होता. अशात महाडमधील काही शेतकऱ्यांनी भुईमुगाची लागवड यशस्वी करून दाखवल्याची माहिती त्यांना मिळाली. भात पिकापाठोपाठ भुईमुगाची लागवड केली, तर ती फायदेशीर ठरू शकते असे त्यांच्या लक्षात आहे. शेताजवळच असणाऱ्या सावित्री नदीतील उपलब्ध पाण्याचा वापर करून त्यांनी शेतकरी गटाच्या माध्यमातून भुईमुगाचा मळा फुलवला. आज या भुईमुगाच्या शेतीतून त्या तिहेरी नफा कमवत आहेत.     रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने त्यांना याकामी सहकार्य केले. पन्नास टक्के अनुदानातून कोकण टपोरा आणि टीएजी २४ या जातीचे बियाणे त्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे, तर शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी डिझेल पंप आणि पाइपलाइनचा पुरवठा अनुदानातून करण्यात आला आहे. काशीबाई सालेकर यांच्याप्रमाणेच महाड- पोलादपूरमधील अनेक शेतकरी आज भुईमुगाकडे वळले आहेत. या दोन तालुक्यांतील ३५० हेक्टरवर आज भुईमुगाची शेती केली जात आहे.      भुईमूग हे नगदी पीक असून यातून शेतकऱ्यांना घरच्या घरी तेल उपलब्ध होते. जास्तीचे तेल बाजारात विकून मोठा नफा होतो, तर गुरांसाठी दर्जेदार पेंड उपलब्ध होते आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आता भुईमुगाची लागवड केली पाहिजे, असे मत रायगड जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
   तर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भुईमुगावर प्रक्रिया करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून बचत गटांना मिनी ऑइल मिल उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महाड-पोलादपूरमध्ये रायगड जिल्हा परिषदेचा पथदर्शी प्रकल्प म्हणून हा राबवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तेल गाळपासाठी यापुढे पुण्याला जायची गरज राहणार नसल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती चंद्रकांत कळंबे यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या काळात भुईमूग शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी भात पीक स्पर्धेच्या धर्तीवर भुईमूग पीक स्पर्धा घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.