News Flash

छत्रपतींचा ‘रायगड’ कात टाकतोय..

गड संवर्धनाची कामे प्रगतिपथावर

गड संवर्धनाची कामे प्रगतिपथावर

रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगडवर सुरू असलेली कामे प्रगतिपथावर आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये रायगडचे बदललेले रूप पाहायला मिळेल असा विश्वास रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकारांसमवेत किल्ले रायगडचा दौरा केला आणि झालेल्या आणि सुरू असलेल्या कामांची माहिती पत्रकारांना दिली.

किल्ले रायगड आणि परिसरातील २१ गावांतील विकासकामांसाठी सहाशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात त्यापकी केवळ १२० कोटी रुपये प्रत्यक्षात रायगड किल्ला संवर्धनाच्या कामावर खर्च करण्यात येणार आहेत. उर्वरित निधी हा या प्राधिकरणात समाविष्ट करण्यात आलेल्या २१ गावांमध्ये विविध प्रकारची विकासकामे आणि सुविधा उपलब्ध करून देण्यावर खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्खनन आणि ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धन कामासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी पुरातत्त्व विभागाकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. यातून उत्खनन, गडावरील कोअर एरिया, तटबंदी आणि मनोऱ्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. शिर्काई मंदिर, व्याडेश्वर मंदिर, जगदीश्वर मंदिर या परिसरातील संवर्धनाची कामे पूर्ण झाली असून ती या वेळेस पत्रकारांना दाखविण्यात आली. संवर्धनासाठी ६०० कोटी मंजूर झाले असून त्यापकी १२० कोटी रुपये रायगडवर तर उर्वरित रक्कम प्राधिकरणातील २१ गावांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर खर्च करण्यात येणार आहे.

गडावरील ८४ पाण्याच्या टाक्यांपकी २१ टाक्यांतील, त्याचप्रमाणे कुशावर्त तलाव आणि हत्ती तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ज्या टाक्यांमधील गाळ साफ करण्यात आला आहे, त्या टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य झाले आहे. गाळ काढण्यात आल्याने या सर्व ठिकाणांवरील पाणी साठवण क्षमतादेखील वाढली आहे.

चित्तदरवाजा, कुशावर्त तलाव परिसर, हत्ती तलाव, शिवकालीन नालेव्यवस्था, शिर्काई मंदिर, नाना दरवाजा या भागात पूर्ण झालेली आणि सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी जाऊन खा. संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांना या कामांची प्रत्यक्ष माहिती या वेळेस दिली.

पाचाड परिसरात ८८ एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्या ठिकाणी शिवसृष्टी, युद्ध संग्रहालय, शिवकालीन वस्तूंचे संग्रहालय उभे करण्याचा आपला मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. किल्ले रायगड परिसरातील जी २१ गावे रायगड प्राधिकरणामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत, त्या गावांमध्ये स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रितनिधी यांना विश्वासात घेऊन कामे करण्यात येणार असल्याचे खा. संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यामध्ये कार्यकारी अभियंता विश्वनाथ सातपुते, प्राधिकरणाचे कॉन्झर्वेशन इंजिनीअर श्री. भामरे, त्याचप्रमाणे अन्य शासकीय अधिकारी सहभागी झाले होते. हा पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर पाचाड येथील देशमुख हॉटेलमध्ये खा. संभाजीराजे छत्रपती यांनी महाडचे प्रांताधिकारी श्री. विठ्ठल इनामदार आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 12:48 am

Web Title: raigad fort
Next Stories
1 हिंदुत्ववादी विरुद्ध हिंदुत्ववादी
2 पाण्याच्या दरवाढीमुळे औद्योगिक कंपन्यांचा राज्यातून जाण्याचा इशारा
3 पंढरपूर: कार्तिकी वारीनिमित्त उद्यापासून श्री विठ्ठल-रक्मिणीचे २४ तास दर्शन
Just Now!
X