दिवाळीची सुट्टी सेलिब्रेट करण्यासाठी रायगडमध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली असून बहुतांश पर्यटन केंद्रावर पुढील सात दिवस हाऊस फुलचे बोर्ड लागले आहे.
निळाशार समुद्र आणि नारळी-पोफळीच्या बागा यांचे पर्यटकांना नेहमीच अप्रूप वाटत आले आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवसांत कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असते. रायगडातील समुद्रकिनाऱ्यांना भेट दिल्यावर सध्या याचाच अनुभव येत आहे. दिवाळीच्या सुट्टीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी रायगडमध्ये पर्यटक मोठय़ा संख्येने दाखल झाले आहेत.  जिल्ह्य़ातील अलिबाग, मुरुड, नागाव, काशिद, दिवेआगर, हरीहरेश्वर आणि श्रीवर्धनमधील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. या ठिकाणच्या हॉटेल्स आणि लॉजिंगवर सध्या हाऊस फुलचे बोर्ड लागले असल्याचे दिसून येत आहे. येत्या १२ तारखेपर्यंत बहुतांश हॉटेल्समधे बुकिंग फुल झाले असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले आहे. अलिबाग मुरुड परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांत जवळपास १० ते १५ हजार पर्यटकांनी भेट दिली आहे.
तर थंड हवेचे ठिकाण म्हणून जगभरात नावलौकिक मिळवलेल्या माथेरानमध्येही पर्यटक मोठय़ा संख्येने दाखल झाले आहेत. गेल्या सात दिवसांत इथेही जवळपास सहा हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. तर येणाऱ्या सात दिवसांत आणखीन चार ते पाच हजार पर्यटक भेट देण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. येणाऱ्या पयर्टकांना आकर्षति करण्यासाठी विशेष पॅकेजेस आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड किल्ल्यावरही दिवाळी साजरी करण्यासाठी पर्यटकांनी हजेरी लावली आहे.