नारळ आणि सुपारी बागायतदारांना झाडांच्या संख्येनुसार मदत देण्याबाबत राज्य सरकारने तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही याबाबत सकारात्मक आहेत. दोन ते तीन दिवसात याबाबतचा निर्णय होऊन आदेश निर्गमित होतील अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली. ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. बँकांच्या आडमुठ्या भुमिकेमुळे मदत वाटपास उशीर होत आहे. मदत वाटपाचे काम पुर्ण होण्यासाठी बँकामध्ये १०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक असल्याचे मतही त्य़ांनी यावेळी व्यक्त केले. बागायतींना हेक्टरी मदत न देता नुकसान झालेल्या झाडांच्या संख्येनुसार मदत दिली जावी अशी मागणी खासदार तटकरे यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे. याबाबत सकारात्मक निर्णय झाला असून लवकरच याबद्दल आदेश निघतील असं तटकरे म्हणाले.

जिल्ह्यात मदत वाटपाचे काम सुरु आहे. घरांच्या नुकसानीसाठी १३० कोटी रुपयांची मदत आपदग्रस्तांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. राष्ट्रीयकृत बँकाच्या आडमुठ्या भुमिकेमुळे मदत वाटपास उशीर होत आहे. मदत वाटपाचे काम पुर्ण होत नाही तोवर बँकांमधील १०० टक्के कर्मचारी उपस्थित रहायला हवेत. बँका शनिवार आणि रविवारी सुरु रहायला हव्यात अशी मागणी सुनिल तटकरे यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पुढाकार घेऊन याबाबतचे निर्देश बँकाना द्यायला हवेत.

दरम्यान, जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मुंबई, ठाणे, नवीमुंबई, रत्नागिरी, सिंधूदूर्ग जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अनेक निर्बंधही लावले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातही कठोर पाऊले उचलावी लागतील. स्थानिक प्रशासनावर निर्णय सोडून चालणार नाही. जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्यांची व्यक्तींची नोंद ठेवायला हवी, यासाठी खारपाडा येथील तपासणी नाका पुन्हा एकदा कार्यान्वयीत करावा लागेल असे मत तटकरे यांनी व्यक्त केले. टाळेबंदीमुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक व्यवसायिकांची कर्ज थकली आहेत. त्यांना दिलासा द्यायला हवा, कर्जाचे पुर्नगठन करता येईल का याचा विचार करावा लागेल. या संदर्भात पर्यटन विभागाला आढावा घेऊन अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पर्यटन व्यवसायिकांना मदत दिली तर वित्तीयभार किती येईल याची चाचपणी सुरु असल्याचेही तटकरे यांनी यावेळी सांगीतले.