रायगड जिल्ह्य़ातील घटना
स्वस्तात सोने देतो असे सांगून १ कोटी १५ लाख रुपये लुटून नेणाऱ्या १० जणांच्या टोळीला रायगड पोलिसांनी २४ तासांमध्ये जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून १ कोटी ८ लाख, ८ हजार रुपये रोख, ३ दुचाकी वाहने, २ मोटार, १ सोन्याची चन इ. सामान हस्तगत करण्यात आली आहेत.
रायगड जिल्ह्य़ात चोऱ्या आणि दरोडय़ांचे सत्र सुरूच असताना स्वस्तात सोने देतो सांगून पाली येथे आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी १ कोटी १५ लाख ७५ हजारांची रोकड लुटल्याची घटना समोर आली. दरोडेखोरांनी या वेळी केलेल्या हल्ल्यात ५ जण जखमी झाले आहेत. रमेश भिकमचंद परमार, रा. पाली यांना हरिश्चंद्र गुडेकर यांनी पाच ते सहा किलो सोने स्वस्तात घेऊन देतो व त्याकरिता तुम्ही ठरलेली रक्कम घेऊन माझ्यासोबत चला असे सांगितले. तोळ्यामागे १० हजार रुपये वाचणार असल्याने परमार यांनी गुडेकर यांचा प्रस्ताव स्वीकारला. यानंतर परमार व त्यांचे सहकारी स्वप्निल परमार, संकेत परमार, कमलेश जैन, ललित ओसवाल यांना सुधागड तालुक्यातील पायरीची वाडी येथे हरिशचंद्र गुडेकर काम करीत असलेल्या फार्महाऊसवर ते घेऊन गेले. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ७ ते ८ जण अनोळखी या ठिकाणी दाखल झाले. सोबत आणलेल्या धारदार व घातक शस्त्राने वार करून त्यांनी भिकमचंद परमार यांच्या ताब्यातील १ कोटी १५ लाख ७५ हजार रुपयाची रोकड ताब्यात घेतली, त्यांच्याजवळील सोन्याची चेन व मोबाइल लुटून नेण्यात आले. या वेळी परमार यांच्यासोबत असलेल्या इतर पाच जणांवरही शस्त्रांनी वार करण्यात आले. या हल्ल्यात ते गंभीररीत्या जखमी झाले. या जखमींवर पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३९४, ३९५, तसेच शस्त्र अधिनियम ४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपास सुरू होता. गुन्ह्य़ाच्या तपासासाठी रायगड पोलिसांची तीन पथके करण्यात आली होती. यात पाली, रोहा आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचा समावेश होता. तपासानंतर रोहा आणि पाली येथून सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तर गुन्ह्य़ातील चार मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने पुणे येथून जेरबंद केले.
या आरोपींकडून १ कोटी ८ लाख ८ हजार एवढी रक्कम आणि एक सोन्याची चेन, गुन्ह्य़ासाठी वापरलेली ३ दुचाकी वाहने, २ चारचाकी गाडय़ा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासकामात पोलीस निरीक्षक व्हनकोटी, पोलीस निरीक्षक धुमाळ, पोलीस उपअधीक्षक अमोल झेंडे आणि पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लुटण्यात आलेली रक्कम आरोपींनी घराजवळील चिखलात प्लास्टिकच्या पिशवीत दडवून ठेवली होती. ही रक्कमही जप्त करण्यात आली.
चौकट वापरावी..
गुन्ह्य़ात लुटण्यात आलेल्या १ कोटी १५ लाख रुपयांपकी १ कोटी ८ लाख रुपयांची
रक्कम जप्त करण्यात आम्हाला यश आले आहे. उर्वरित रक्कमही लवकरच हस्तगत होईल, आरोपींची गुन्हेगारी पाश्र्वभूमी तपासण्याचे काम सुरू आहे. ही माहिती उपलब्ध झाल्यावर आरोपींना मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा विचार केला जाईल, असे रायगडचे पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक यांनी सांगितले.